NewsInTrending : चर्चेतली बातमी : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार -अमित शहा यांची भेट ? सत्य काय आहे ??

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती ‘दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. मात्र या भेटीची बातमी खरी नसल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नवाब मलिक यांनी केला आहे. बाकी काहीही असले तरी या बातमीची सर्वत्र चर्चा होत आहे.
मुंबई । एका गुजराती दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफु्ल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत असून अहमदाबादमधील एका फार्म हाऊसवर त्यांच्यात भेट झाल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने अशी कुठलीही भेट झाली नसल्याचा खुलासा केला आहे.
विशेष म्हणजे अहमदाबादमधील एका फार्महाऊसवर २६ मार्च रोजी रात्री ९. ३० वाजता प्रफुल्ल पटेल व भाजपच्या बड्या उद्योगपतींची भेट झाली. या भेटीवेळी शरद पवार देखील उपस्थित होते. तसेच, शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याचे वृत्त गुजरातमधील एका वृत्तपत्राने दिले आहे. या भेटीसाठी पवारांनी प्रायव्हेट जेट वापरल्याचा दावाही वृत्तात केला आहे.
चर्चेतल्या या वृत्तानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये मोदी यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या गौतम अडाणी या उद्योगपतीची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक पवार आणि पटेल यांचा हा दौर पूर्वनियोजित होता. केवडिया येथील साखर संमेलन आणि एका शाळेच्या कार्यक्रमासाठी हे दोघेही जाणार होते. परंतु हा पूर्वनियोजित कार्यक्रमच झाला नाही. पण पवार आणि पटेल यांची अदानी यांच्याशी भेट मात्र झाली. या भेटीनंतर दोघेही शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास मुंबईला परतले. दरम्यान या भेटीने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना वेग आला आहे . तर या सर्व घडामोडींमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी अहमदाबादमध्ये होते. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनी मात्र अशी कुठली भेटच झाली नसल्याचा दावा केला असून या सगळ्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या आहेत.
भाजपच्या निकटवर्तीय बड्या उद्योगपतीची प्रफुल पटेल यांनी भेट घेतल्याचे सुरुवातीला बोलले जात होते . अहमदाबादमधील फार्महाऊसवर 26 मार्चच्या रात्री 9.30 वाजता ही भेट झाल्याची माहिती होती. विशेष म्हणजे पटेलांची संबंधित उद्योजकाशी भेट झाली, त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही अहमदाबादेतच होते, मात्र या बैठकीला पवार उपस्थित होते का, याची पुष्टी मिळालेली नव्हती.