IndiaNewsUpdate : कृषी कायद्यांविरोधात आज शेतकऱ्यांची भारत बंदची हाक

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. दिल्लीच्या वेशीवर केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला चार महिने पूर्ण झाले असले तरी यावर कुठलाही मार्ग निघालेला नाही . याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून भारत बंदची हाक देण्यात आली असून सकाळीच शेतकऱ्यांकडून गाझीपूर सीमेवर राष्ट्रीय महामार्ग ९ रोखण्यात आला आहे.
दरम्यान संयुक्त किसान मोर्चाचे नेते दर्शन पाल यांनी आंदोलक शेतकऱ्यांकडून दूध तसेच भाज्यांचा पुरवठाही रोखण्यात येईल असे सांगितले आहे. दरम्यान किसान मोर्चाने शेतकऱ्यांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन केले असून बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेड्स उभारले आहेत.
Punjab: Protestors block railway track in Amritsar as a mark of protest against the three agricultural laws during 'Bharat Bandh' called by Samyukt Kisan Morcha pic.twitter.com/dAZgfXa3yw
— ANI (@ANI) March 26, 2021
सकाळी सहा वाजता भारत बंद आंदोलनाला सुरुवात झाली असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन सुरु राहील अशी माहिती संयुक्त किसान मोर्चाने दिली आहे. राजधानी दिल्लीतही बंद पाळला जाईल असे त्यांनी जाहीर केले आहे.
”शेतकरी अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर उतरणार आहेत. भारत बंददरम्यान मार्केट तसंच वाहतूक सेवा बंद असेल,” असे ज्येष्ठ शेतकरी नेते बलबीर सिंग राजेवार यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले तर दुसरीकडे देशातील आठ कोटी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने आपण बंदमध्ये सहभागी नसून मार्केट सुरु राहतील असे जाहीर केले आहे.