MumbaiNewsUpdate : मी जर सरकारमध्ये असतो तर परमबीर सिंह यांना निलंबित केले असते : नाना पटोले

मुंबई : मी जर सरकारमध्ये असतो तर परमबीर सिंह यांना निलंबित केले असते असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके असलेली गाडी आढळल्याच्या प्रकरणातील तपासात काही गंभीर चुका पोलिसांकडून झाल्याने आणि या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष व्हावी यासाठी परमबीर सिंह यांची पोलीस आयुक्तपदावरून बदली केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले होते . नाना पटोले यांनी मात्र आपण बदली नाही तर निलंबन केलं असतं असं म्हटलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
या विषयावर बोलताना पटोले म्हणाले कि , “मी जर सरकारमध्ये असतो तर परमबीर सिंह यांना निलंबित केलं असतं. त्यांनी आता सुप्रीम कोर्टात जावे की हायकोर्टात जावे हा त्यांचा प्रश्न आहे. मोहन डेलकर प्रकऱणानंतर हे सगळं सुरु झालं. अजूनही चौकशी सुरु नाही.. आम्ही दबाव आणला. हे आयुक्त गुन्हे दाखल होणार नाही सांगत होते. मुंबईसारख्या संवेदनशील ठिकाणी या पद्दतीने वागणारे अधिकारी असतील तर मी राहिलो असतो तर बदली केली नसती निलंबितच केले असते ,” असे नाना पटोले म्हणाले .
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केलेल्या आरोपाला उत्तर देताना पटोले म्हणाले कि , “फडणवीस स्वत: न्यायाधीश झाले होते. त्यांच्या मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर ते क्लीन चीट द्यायचे. त्यावेळी का राजीनामा घेतले नाही? राजकारणात आरोप होत असतात पण सत्यता समोर येईपर्यंत राजीनामा घेणं चुकीचं आहे. दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच काँग्रेसची भूमिका आहे. आरोप केल्यानंतर परमबीर सिंग यांच्यासाठी चांगले झाले,” अशी टीका नाना पटोले यांनी केली. “परमबीर सिंह दोषी आहेत की अनिल देशमुख हे तपासावं लागलं. फडणवीसांप्रमाणे उद्धव ठाकरे न्यायाधीश नाहीत. फडणवीस मुख्यमंत्री असताना न्यायाधीशाची भूमिका निभावत होते,” अशी टीका नाना पटोले यांनी केली.