MumbaiNewsUpdate : हप्ता वसुली आणि बदली प्रकरणी परमबीर सिंग यांच्या याचिकेवर आज सुनावणी

मुंबई | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटींच्या हप्तावसुलीचा आरोप आणि बदली प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती सुप्रीम कोर्टाने मान्य केली असून उद्या (बुधवारी) न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
दरम्यान परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा दावा परमबीर सिंग यांच्या पत्रात करण्यात आलेला आहे. याप्रकरणी पुरावे नष्ट केले जाण्याची भीती व्यक्त करत परमबीर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आपल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यात यावी व सीबीआय चौकशीचे निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती परमबीर यांनी याचिकेत केली आहे.
परमबीर यांच्या या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती सुप्रीम कोर्टाने आज मान्य केली असून उद्या (२४ मार्च) या याचिकेवर सुनावणी होणार आहे. परमबीर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करून गृह रक्षक दलात बदली करण्यात आली असून त्या बदलीलाही सिंग यांनी याचिकेत आव्हान दिले आहे. बदलीनंतर नाराज असलेल्या सिंग यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध लेटरबॉम्ब टाकला होता. सिंग यांच्या आरोपांवरून राज्यातले राजकारण ढवळून निघाले आहे. पोलीस दलातही मोठी खळबळ माजलेली आहे. दुसरीकडे देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असून त्यांनीही सिंग यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिलेला आहे.