AurangabadNewsUpdate : पोलिसांनाही आता कोरोना चाचणी बंधनकारक, क्राईम आढावा बैठक झाली रद्द

औरंगाबाद । शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील पाच निरीक्षक कोरोनाबधित असल्याचे सोमवारी पोलीस आयुक्तांनी नियोजीत केलेल्या क्राईम आढावा बैठकी दरम्यान समोर आले. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी नियोजित बैठक रद्द केली. शहरातील १७ पोलीस निरीक्षकांची कोरोना अँटीजेन चाचणी सोमवारी करण्यात आली. त्यापैकी पाच पोलीस निरीक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. दरम्यान, शहर पोलीस दलात आतापर्यंत ३९ अधिकारी आणि ३०२ कर्मचारी बाधित झाले आहेत. तर चौघांचा बळी गेला आहे. दरम्यान आता पोलिसांना दर पंधरा दिवसाला कोरोना चाचणी करावी लागेल असे सांगण्यात येत आहे.
पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सोमवारी मासिक गुन्हे आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला १७ पोलीस निरीक्षक हजर राहणार होते. तत्पुर्वी निरीक्षकांना अँटीजेन चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, निरीक्षकांनी चाचणी केली. तेव्हा चार वरिष्ठ निरीक्षक पॉझिटिव्ह आले. त्यामुळे त्यांना तातडीने आरटीपीसीआर स्वॅब देण्यासाठी मनपाच्या मेल्ट्रॉन कोविड सेंटरमध्ये पाठविण्यात आले. पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी विशेष करून नागरिक आणि वरिष्ठांच्या संपर्कात येणा-या पोलिसांची दर पंधरवाड्याला आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस दलातील बाधितांचा आकडा वाढत आहे़. पाचपेक्षा जास्त अधिकारी बैठकीला येतील, तेव्हा त्यांची देखील आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.