चर्चेतली बातमी : फाटक्या जीन्सच्या चर्चेवर प्रियांका गांधी यांनी व्यक्त केली हि प्रतिक्रिया

Oh my God!!! Their knees are showing 😱😱😱 #RippedJeansTwitter pic.twitter.com/wWqDuccZkq
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) March 18, 2021
नवी दिल्ली : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या फाटक्या जीन्सबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. दरम्यान रावत यांच्या या वक्तव्यावरुन सोशल नेटवर्कींगवरुन त्यांच्यावर टीका केली जात असतानाच काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी यांनींही या वादामध्ये उडी घेतली आहे. प्रियंका गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो पोस्ट करत यांचेही गुडघे दिसत आहेत असा टोला लगावला आहे.
“अरे देवा, त्यांचे गुडघे दिसत आहेत,” अशा कॅप्शनसहीत प्रियंका यांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या फोटोंचं कोलाज आहे. या फोटोंमध्ये हे सर्व वरिष्ठ नेते संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले दिसत असून त्यांनी संघाचा पोशाख म्हणजेच अर्ध्या बाह्यांचा पांढरा शर्ट आणि हाफ पॅण्ट घातलेली दिसत आहे. रावत यांनी गुडघे दिसणाऱ्या महिलांसंदर्भात वक्तव्य केल्याने त्याचा आधार घेत प्रियंका यांनी या वरिष्ठ नेत्यांचेही गुडघे दिसत होते असा टोला लगावला आहे.