MumbaiNewsUpdate : राजीनाम्याच्या बातमीत तथ्य नाही : गृहमंत्री

मुंबई । मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील जीपमध्ये आढळलेल्या जिलेटीन कांड्या प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात निलंबित आणि अटकेत असलेल्या सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदली नंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मंत्रिपद जाणार असल्याच्या कंड्या पिकवल्या जात आहेत. वास्तविक या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी स्वतः अनिल देशमुख यांना क्लीन चिट देऊनही विरोधक अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. मात्र आपल्या राजीनाम्याच्या बातमीत तथ्य नसल्याचे स्वतः अनिल देशमुख यांनी ट्विट केले आहे.
आज मी विदर्भातील महत्वपूर्ण अशा मिहान प्रकल्पासंदर्भात मा.पवार साहेबांची भेट घेतली व मागील २ दिवसांत मनसुख हिरेन व सचिन वाझे प्रकरणाविषयी #ATS व #NIA ने केलेल्या तपासाची चर्चा झाली. इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझ्या राजीनाम्याच्या ज्या बातम्या दाखवण्यात आल्या,त्यात कोणतेही तथ्य नाही.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 19, 2021
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा लावून धरला होता . गृहविभागावर गृहमंत्री अनिल देशमुखांची पकड नसल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान अधिवेशन संपल्यानंतर या मुद्यावर महाविकास आघाडी सरकारच अडचणीत असल्याचं चित्र उभं राहिलं. याप्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारची आणि मुंबई पोलीस दलाची प्रचंड बदनामी झाली. सरकारची प्रतिमा जपण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी करण्यात आली. पोलीस आयुक्तांच्या बदलीवर हे प्रकरण थांबेल अशी शक्यता होती. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल मुंबई पोलीस दलात सुरू असलेल्या गटबाजीबाबत जाहीर वक्तव्य केले . तसेच पोलीस अधिकाऱ्यांकडून काही गंभीर चुका झाल्याची कुबुलीही त्यांनी दिली.
दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या या विधानानंतर त्यांना तात्काळ शरद पवारांनी दिल्लीला बोलवून घेतल्याची चर्चा आहे. दिल्लीत अनिल देशमुख आणि शरद पवार यांच्यात जवळपास दीड तास चर्चा झाली. या भेटीत अँटलिया स्फोटक प्रकरणी शरद पवारांना सविस्तर माहिती दिली, तसंच राज्यातील इतर प्रश्नांची चर्चा झाल्याचेही अनिल देशमुख यांनी भेटीनंतर सांगितले. आता त्यांनी स्वतः ट्विट करत आपल्या राजीनाम्यांच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे.