Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : कोरोनाला थोपवण्यासाठी प्रतिदिन ३ लक्ष लसींचे उद्दिष्ट : मुख्यमंत्री

Spread the love

मुंबई : एकीकडे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असला तरी लसीकरणाचा वेगही वाढविण्याचे आव्हान आपल्यासमोर असून येत्या तीन ते चार महिन्यांत प्राधान्य गटातील सर्वांना दोन डोस द्यायचेच आहेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

मुख्यमंत्री ठाकरे आज विभागीय आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे कोविड लसीकरण व कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात दर दिवशी आढळणाऱ्या रुग्णांपेक्षा आज रोजीची संख्या उच्चांकी असून राज्यातील जिल्हा प्रशासनाने अतिशय वेगाने रुग्ण आणि त्यांचे संपर्क शोधणे गरजेचे आहे. त्यासोबत निर्बंधांचे आणि आरोग्य नियमांचे काटेकोर पालन व्हायला हवे यासाठीही पावले उचलण्याची गरज आहे, असे निर्देश या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या फिल्ड रुग्णालयांमध्ये रुग्ण वाढत आहेत. येणारा पावसाळा लक्षात घेऊन त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे व आवश्यक ती देखभाल व दुरुस्ती करून घ्यावी जेणेकरून पावसाचा त्रास होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोना विषाणूच्या बदलत्या लक्षणांची नोंद वैद्यकीय तज्ज्ञांनी घ्यावी. तसेच आवश्यक त्या उपचार पद्धतीविषयी राज्यातील डॉक्टर्सना मार्गदर्शन करावे, अशी महत्त्वाची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

कोविड लसीकरणात महाराष्ट्र हा संपूर्ण देशात राजस्थाननंतर दुसऱ्या क्रमांकावर असल्याची बाब समाधानकारक आहे. मात्र दर दिवशी ३ लाख लस दिल्या पाहिजेत यादृष्टीने नियोजन करावे, असे मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागास सांगितले. राज्यात बहुतांश ठिकाणी तीव्र उन्हाळा असतो, त्याचा परिणाम लसीकरणावर होऊ शकतो हे गृहित धरून नागरिकांना दुपारच्या आत किंवा दुपारनंतर व उशिरा रात्री पर्यंत लस देण्याची व्यवस्था करावी तसेच ज्येष्ठ व सहव्याधी रुग्ण रांगांमध्ये उभे असतात त्यांची गैरसोय होणार नाही व कुठेही वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात १३४ खासगी रुग्णालयांना बुधवारी केंद्राने लसीकरणासाठी मान्यता दिली असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!