CoronaMaharashtraUpdate : राज्यात पुन्हा धडकी भरवणारे आकडे !! प्रोटोकॉलचे पालन करा अन्यथा लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही : मुख्यमंत्री

मुंबई । राज्यात करोनाचा कहर कायम असून सलग दुसऱ्या दिवशीही २५ हजारांवर नवीन बाधितांची भर पडली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २५ हजार ६८१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर १४ हजार ४०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज ७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. दरम्यान, राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पावणेदोन लाखांचा आकडा पार करून पुढे गेली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करा अन्यथा लॉकडाऊन शिवाय पर्याय राहणार नाही असा पुन्हा एकदा इशारा दिला आहे.
Number of #COVID19 patients had increased in Sept 2020 as well. But today we have vaccine as a shield. Citizens should get vaccinated. Rules should be followed so that there's no infection. But if rules aren't followed, strict measures will be taken in near future: Maharashtra CM pic.twitter.com/B0fgmbUdqC
— ANI (@ANI) March 19, 2021
बुधवारी राज्यात २३ हजार १७९ नवीन रुग्णांचे निदान झाले होते. त्यानंतर गुरुवारी त्यात वाढ झाली व २५ हजार ८३३ रुग्णांची नव्याने भर पडली. करोनाची साथ आल्यापासूनचा हा एका दिवसातील उच्चांक ठरला. त्यानंतर आज पुन्हा एकदा राज्यात २५ हजारांवर नवीन रुग्ण आढळून आल्याने चिंतेत भर पडली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने आजची आकडेवारी जाहीर केली असून हे आकडे धडकी भरवणारे आहेत. आज राज्यात ७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत ५३ हजार २०८ जणांचा या साथीने बळी घेतला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२० टक्के एवढा आहे. आज राज्यात २५ हजार ६८१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर १४ हजार ४०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण २१ लाख ८९ हजार ९६५ करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ९०.४२ टक्के एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८० लाख ८३ हजार ९७७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४ लाख २२ हजार २१ (१३.३९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८ लाख ६७ हजार ३३३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ७ हजार ८४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
अॅक्टिव्ह रुग्णसंख्या पोहचली पावणेदोन लाखांवर
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा पावणेदोन लाखांच्यावर गेला आहे. आजच्या नोंदीनुसार राज्यात १ लाख ७७ हजार ५६० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक ३७ हजार ३८४ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यापाठोपाठ नागपूर जिल्ह्यातही करोनाचा उद्रेक पाहायला मिळत असून तिथे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता २५ हजार ८६१ इतकी झाली आहे. मुंबई पालिका हद्दीत सध्या १८ हजार ८५० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर ठाणे जिल्ह्यात हा आकडा १६ हजार ७३५ इतका आहे.