Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SachinWaze : NewsInTrending : सचिन वाझे प्रकरणात आज नेमके काय काय झाले ?

Spread the love

मुंबई : बहुचर्चित एपीआय सचिन वाझे  अटक प्रकरणावरून भाजपने चर्चा तेवत ठेवली असून आज दिवसभर प्रसार माध्यमांमध्ये यावरून राळ उठलेली असताना तपासात सहकार्य करत नाहीत म्हणून त्यांना अटक केली, अशी माहिती एनआयएने  सोमवारी मुंबई सत्र न्यायालयात दिली आहे. इतकंच काय तर, सचिन वाझे ह चौकशीला येताना सोबत आपला फोन घेऊन आले नव्हते, तसेच ते कुटुंबियांचा नंबरही देण्यास तयार नाहीत म्हणून मग शेवटी त्यांच्या पोलीस स्टेशनलाच रात्री उशिरा त्यांच्या अटकेची माहिती द्यावी लागली, अशी माहिती तपासयंत्रणेने  कोर्टात दिली. दरम्यान आपली अटक बेकायदा असून आपल्याला वकिलांशीही भेटण्यास दिले  जात नसल्याचा आरोप करत सचिन वाझे यांची एनआयए कोर्टात याचिका केली आहे. त्यावर आजपासून सुनावणी  सुरु झाली आहे .


दरम्यान  एनआयएने मात्र  हे आरोप फेटाळून लावत वाझेंना वकिलाशी भेटू देण्यात काहीच अडचण नाही. मंगळवारी भेटीच्या वेळा कोर्टाला कळवू असे  स्पष्ट केले . तसेच एनआयएच्या इंट्रोगेशन रूममध्ये सीसीटिव्ही कॅमेरा  नसल्याची तक्रारही वाझेंच्यावतीने  न्यायालयात करण्यात आली. हादेखील आरोप एनआयएने  फेटाळून लावला. वाझेंना शनिवारी दिवसभर एसपींच्या केबिनमध्ये बसवले  होते . जिथं कॅमेरा नाही, पण इंट्रोगेशन रूममध्ये सीसीटिव्ही असल्याची एनआयएकडून न्यायालयाला सांगण्यात आले . वाझेंची चौकशी करताना त्यांच्या केस डायरीत काही अनियमितता आढळल्या म्हणून सहाय्यक आयुक्तपदाच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचा खुलासा एनआयएने  कोर्टात  केला. उद्याही  याप्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे.

सचिन वाझे यांच्या भावाची  मुंबई उच्च न्यायालयात याचिका

दरम्यान, अंबानी यांच्या घराबाहेरील सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या  आणि ऑटोमोबाईल व्यावसायिक मनसूख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या भावाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने  (एनआयए) माझा भाऊ सचिनला बेकायदा ताब्यात घेऊन अटक केली. त्यामुळे सचिनला मुंबई उच्च न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी विनंती या याचिकेतून करण्यात आली असून त्यावर लवकरच यावर सुनावणी अपेक्षित आहे.

या याचिकेत त्यांनी म्हटले आहे कि , सचिन वाझे यांना एनआयएकडून शनिवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली. त्यानंतर एनआयए विशेष न्यायालयाने त्यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. त्याविरोधात सचिन वाझे यांचा भाऊ सुधर्म यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अॅड. सनी पुनामिया यांच्यामार्फत हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली आहे. दिवंगत मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांचा वापर करून काही  प्रभावी राजकीय  नेत्यांनी सचिन वाझेंना बळीचा बकरा बनवला आहे. तसेच अँटिलिया प्रकरणात ठोस पुरावे नसतानाही सचिनला त्यात गोवण्यात आल्याचा आरोपही याचिकेतून करण्यात आला आहे. एनआयएनेही बेकायदा पद्धतीने सचिनला ताब्यात घेऊन अटक केल्याचा आरोपही याचिकेतून करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणात एनआयएने  मुंबई पोलिसांच्या मोटार वाहन दुरुस्ती विभागातून अंबानी प्रकरणी वापरण्यात आलेली इनोव्हा गाडी जप्त  केलेली  असून ही गाडी वाझे यांच्या शासकीय पथकाने वापरल्याचा दावा  या याचिकेतून केला आहे. त्यामुळे या प्रकरणात वाझे यांचा सहभाग असल्याचे पुरावे असून या कटात अन्य व्यक्तीचाही सहभाग असल्याचा संशयही एनआयएने व्यक्त केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!