#MaharashtraCoronaUpdate : राज्यात १५ हजार ६०२ नवीन करोनाबाधित रूग्ण ; ८८ मृत्यू

राज्यातील करोनाचा संसर्ग वाढत असल्याने या राज्यात कठोर निर्बंध लागू केले जात आहे तसेच अनेक शहरांमध्ये लॉकडाउन देखील घोषित करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सूचक इशारा दिलेला आहे. आज दिवसभरात राज्यात ८८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, १५ हजार ६०२ नवीन करोनाबाधित वाढले आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर २.३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत राज्यात ५२ हजार ८११ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, ७ हजार ४६७ रुग्ण करोनातून बरे झाले, राज्यात आजपर्यंत एकूण २१,२५,२११ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४९ टक्के झाले आहे.
Maharashtra reports 15,602 new COVID-19 cases, 7,467 discharges, and 88 deaths in the last 24 hours
Total cases: 22,97,793
Total discharges: 21,25,211
Active cases: 1,18,525
Death toll: 52,811 pic.twitter.com/GeWnZZG5Bg— ANI (@ANI) March 13, 2021
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७४,०८,५०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,९७,७९३ (१३.२० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,७०,६९५ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत तर ५ हजार ३१ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,१८,५२५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
देशभरात काही दिवसात नव्याने सापडलेल्या करोनाबाधितांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणेसोबतच राज्यातील आरोग्य प्रशासन आणि राज्य सरकारची देखील चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हॉटेल, उपहारगृह आणि मॉलच्या प्रतिनिधींची ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भेट घेतली. यावेळी त्यांनी आवाहन करताना कडक निर्बंधांबाबत देखील इशारा दिला आहे.