एमपीएससीच्या प्रमुखांनी तारखांचा घोळ मिटवून उद्याच तारीख जाहीर करा : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हमधून जनतेशी संवाद साधताना एमपीएससीच्या निर्णयाबद्दलम मोठी घोषणा केली आहे. येत्या 14 मार्चला होणारी राज्य सेवा आयोगाची पूर्वपरीक्षा तीन दिवसांआधी ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने जाहीर केला होता. यामुळे राज्यभरातील एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे त्यांना आश्वासन देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पुढच्या आठडाभरात परीक्षा निश्चित होणार आहे.
यावर्षी मार्च महिन्यात होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 14 मार्च रोजी ही परीक्षा होणार होती. दरम्यान या परीक्षेच्या तारखा गेल्या दीड वर्षात पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्याने परीक्षार्थी नाराज आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की; “विद्यार्थ्यांच्या भावनांशी मी सहमत आहे. केवळ काही दिवसांसाठी 14 तारखेची परीक्षा पुढे ढकलत आहोत. मुख्य सचिव आणि एमपीएससीच्या प्रमुखांना तारखांचा घोळ मिटवून उद्याच तारीख जाहीर करा, अशी सूचना केली आहे. येत्या आठवड्याभरात ही परीक्षा होणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याचं कारण कोरोनाच आहे. लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांबरोबर चर्चा सुरू आहे. परीक्षा यंत्रणा खूप मोठी आहे. कोरोनाची परिस्थिती अधिक बिकट झाल्याने परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी वेळ लागत आहे. परीक्षेची व्यवस्था करावी लागते, यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची तयारी करुन घ्यावी लागणार आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग परीक्षेदरम्यान होऊ नये यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच लस घेतलेलेच कर्मचारी परीक्षेसाठी देण्याची सूचना मी केली आहे, असेही ते म्हणाले. यंत्रणेतल्या सर्वांची कोरोना चाचणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रक जारी करून परीक्षा रद्द करण्यात आली आहे ही माहिती दिली होती. अगदी चार दिवस राहिलेले असताना परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांच्यात प्रचंड नाराजी पसरली. त्यामुळे शेकडो विद्यार्थी पुण्यात रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत आयोगाचा निषेध व्यक्त केला.