MaharashtraNewsUpdate : राज्यातील लॉकडाऊन विषयी बोलले मुख्यमंत्री

मुंबई : दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने जनता कर्फ्यू, नाइट कर्फ्यू, लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत काय निर्णय घेतात या विषयी प्रश्न उपस्थित केले जात असतानाच मुख्यमंत्र्यांनी राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची सरकारची तरी इच्छा नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले. मात्र मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि , कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी करोनाचे नियम काटेकोरपणे पाळायला हवेत व लॉकडाऊन टाळायला हवा, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत सरकारची भूमिका मांडली. आव्हानात्मक स्थितीतही अर्थसंकल्पीय अधिवेशन व्यवस्थित पार पडलं, त्यासाठी त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले . नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्याबाबत प्रश्न विचारला असता या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे तिथे होणारा प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. आता नाणार सोडून अन्यत्र रिफायनरी प्रकल्प होणार असेल व त्याला स्थानिकांचा विरोध नसेल तर मग आमची कोणतीच हरकत नाही. आम्ही प्रकल्पांच्या विरोधात कधीच नव्हतो पण त्यासोबतच पर्यावरणाचाही विचार व्हावा या मताचा मी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड होणे हे भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. हा विषय सध्या कोर्टात आहे आणि कोर्टात न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.