रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : उद्धव ठाकरे

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थिती होती पण रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आम्ही मांडला आहे.
कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अशा स्थितीत जनतेला काय दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशात देखील सरकारकडून विविध योजनांची घोषणा करण्यात आली असून, अनेक विभागांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची घोषणा देखील करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्याला अपेक्षित येणे किती होते आणि प्रत्यक्षात आले किती याची आकडेवारी सांगितली आहेच. पण केंद्र सरकारकडून किती येणे आहे हे देखील सगळ्यांना माहिती आहे. पण रडगाणं न गाता आर्थिक परिस्थितीचा सामना करत समाजातल्या सर्व थरांना आधार देणारा आणि त्याच बरोबरीने राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प सरकारच्या वतीने अर्थमंत्र्यांनी मांडला आहे. त्यासाठी मी अर्थमंत्री आणि अर्थ राज्यमंत्री यांचे अभिनंदन करतो. कोरोना महामारीमुळे हे वर्ष आव्हानात्मक आहे. प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक समाज, समाजातला प्रत्येक घटक यांच्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद आहे. महिलांना स्वत:च्या पायावर स्वाभिमानाने उभे करणे हे आमचे कर्तव्य आहे. प्रत्येकजण आपापल्या चष्म्यातून अर्थसंकल्पाकडे पाहू शकतो. तो त्यांचा अधिकार आहे. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.