MumbaiNewsUpdate : “हिरेन मनसुख यांची आत्महत्या नसून खूनच”

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी कार सापडलेल्या प्रकरणात हिरेन मनसुख यांच्या संशयास्पद मृत्यू झाला. अखेर त्यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट हा समोर आला आहे. हिरेन मृतदेह सापडल्याच्या 12 ते 24 तास आधी त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या शरीरावर कोणत्याही मोठ्या जखमा नाहीत. या रिपोर्टमध्ये नाका तोंडात पाणी गेले असून शरीरावर कोणत्याही जखमा नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच कोणत्याही घातपाताचा उल्लेख या शवविच्छेदन अहवालात नाही.
दरम्यान त्यांच्या शरीराच्या कोणत्याही अवयवांना दुखापत झालेली नाही, असेही प्राथमिक शवविच्छेदन अहवालात सांगण्यात आले आहे. मृत्यूचे नेमके कारण हे केमिकल अॅनालिसिसनंतर समोर येणार आहे. त्यांचा मृत्यू बुडून झाला की हा घातपात हे केमिकल अॅनालिसिसमधून स्पष्ट होईल. मनसुख हिरेन यांच्या चेहऱ्यावरील जखमांवरुन काही प्रश्न उपस्थित होत आहेत. शवविच्छेदन अहवालाता मृत्यूचे प्राथमिक कारण समोर येईल अशी अपेक्षा होती. परंतु अहवालात मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी संध्याकाळी मुंब्राच्या खाडीत आढळून आला होता. त्यानंतर त्यांच्या मृतदेहावर व्हिडीओ कॅमेऱ्यात पोस्टमार्टम करण्यात आले होते. तब्बल 3 तास पोस्टमार्टम चालले होते. यात 4 डॉक्टरांच्या टीमने पोस्टमार्टम केले होते. विसेरा फॉरेन्सिकलॅबकडे पाठविण्यात आला आहे. हिरेन मनसुख यांच्या घरच्यांनी शवविच्छेदनाच्या अहवालाची प्रत दिली आहे. यात मृत्येचे कारण स्पष्ट नाही. छातीत काही अंशी पाणी आढळले आहे. नाकातून रक्त आले होते आणि शरीराच्या बाहेरील बाजूस कोणत्याही जखमा नाहीत, असे या अहवालात म्हटले आहे.
दरम्यान आज सकाळी मनसुख हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी नकार दिला होता. जोपर्यंत पोस्टमार्टम अहवाल जाहीर करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मनसुख यांच्या कुटुंबीयांनी मांडली होती. अखेर पोलिसांनी पोस्टमार्टमची प्रत हिरेन यांच्या कुटुंबीयांनी देण्यात आल्या नंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीय तयार झाले. पार्थिव निवासस्थानी पोहचवले दरम्यान, त्यांच्या इमारती जवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, काही तासांत मनसुख यांच्या अंत्यासंस्कार करण्यात येतील.
त्यांनी आत्महत्या केली नसून हा खूनच
हिरेन हे उत्तम पोहणारे होते व त्यांना कोणतेही टेन्शन नसल्याने त्यांनी आत्महत्या केली नसून हा खूनच असल्याचा दावा त्यांच्या पत्नी व मित्रानी केला आहे. स्फोटकांनी भरलेली हिरेन मनसूख यांची स्कोर्पिओ गाडी दक्षिण मुंबई येथील कार मायकल रोडवर मिळाल्याने गोंधळ उडाला होता. ती गाडी मनसूख हिरेन यांची असल्याचे सिद्ध होताच त्यांच्या पाठी गुन्हे शाखेचा ससेमीरा लागला होता. शुक्रवारी सकाळी देखील ते कांदिवली गुन्हे शाखेच्या तावडे नामक अधिकाऱ्याला भेटायला जातो, असे सांगून घरातून निघाले ते पुन्हा परतलेच नसल्याचे त्यांच्या पत्नी आणि भावाने सांगितले. ते पोलिसाना संपूर्णतः सहयोग करत होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या का केली? असा सवाल देखील त्यांच्या पत्नी आणि भावाने उपस्थित केला. त्यांच्या मृतदेहच्या चेहऱ्यावर अनेक रुमाल का होते, याचा देखील जाब त्यांनी विचारला. हिरेन मनसूख हे अत्यंत साधे सरळ व्यापारी होते व अव्वल जलतरणपटू असल्याने त्याने खाडीत उडी मारून जीव देणे शक्यच नसल्याचा दावा हिरेन मनसुख यांचे मोठे बंघू विनोद मनसुख यांनी केला. या प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे तपास व्हावा अशी मागणी सर्वांनीच केली आहे