व्हायरल व्हिडीओ : जळगाव पोलीस झाले बदनाम , गृहमंत्र्यांचे चौकशी आदेश

मुंबई : जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने महाराष्ट्र हादरुन गेला होता. या घटनेची गंभीर दखल महारष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे. जळगावच्या महिला वसतीगृहातील घटनेच्या चौकशीसाठी चार महिला अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
दरम्यान जळगावच्या घटनेच्या चौकशीसाठी तेथील स्थानिक स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाईल. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले.
जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा आरोप केला जात आहे, असे म्हणत घडलेली घटना गंभीर आहे. याची सविस्तर चौकशीची मागणी विधानपरिषद सदस्य मनीषा कायंदे आणि प्रसाद लाड यांनी केली होती.या मुद्यावर उत्तर देताना गृहमंत्र्यांनी चार महिला अधिकाऱ्यांची समितीची घोषणा केली.
जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील पुरुष मंडळी या कृत्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. सामाजिक संघटनांनी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. एक धक्कादायक व्हिडीओ मुळे जळगाव पोलीसांचे ते कृष्ण कृत्य उघडे झाले असून त्याची लक्तरे आज विधानपरिषदेत टांगली गेली.
जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा आरोप केला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे या कृत्याचा व्हिडीओही सादर करण्यात आला आहे. एक मार्च रोजी काही पोलीस कर्मचारी आणि बाहेरील पुरुषांनी मुलींना कपडे काढून जबरदस्तीने नृत्य करायला भाग पाडल्याचे या व्हायरल व्हिडिओत दिसत आहे.