PuneCoronaUpdate : पुण्यात रात्रीच्या संचारबंदीची तारीख वाढली , हॉटेल, रेस्टॉरंट, बार, पब यांना रात्री ११ वाजेपर्यंत परवानगी

पुणे शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता दि. २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र आता १४ मार्चपर्यंत रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी वाढवण्यात आली आहे. पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी याबाबत आदेश काढला आहे. दरम्यान पुणे शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बार, पब यांना रात्री ११ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
पुणे शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर जोरदार कारवाई सुरू आहे. रविवारी दिवसभरात पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या ८५३ नागरिकांवर कारवाई करत चार लाख १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. कोरोना संसर्गाचा वाढता धोका पाहता प्रशासन अॅलर्ट झाले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. नियमांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सध्या राज्यात करोनाचे सर्वाधिक १५ हजार १९९ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यात पुणे पालिका हद्दीत रुग्णवाढ अधिक आहे. पुणे शहरात गेल्या २४ तासांत ४२७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊनच पालिका प्रशासन प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी म्हणून शहरात रात्रीची संचारबंदी वाढवण्यात आली आहे.