MaharashtraAssemblyUpdate : अजित पवार -देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी , विरोधकांचा सभात्याग

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज प्रारंभ झाला. राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली आणि कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर वैधानिक विकास मंडळाच्या नियुक्त्यावरुन आणि राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावरून सरकार आणि विरोधक यांच्यात जुंपली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी वैधानिक विकास मंडळावरील नियुक्त्या केल्या जाव्यात अशी मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या निवडीची 12 नाव जाहीर होतील त्याच्या दुसऱ्या दिवशी वैधानिक विकास मंडळ जाहीर होतील, असे म्हटल्याने विधानसभेत वातावरण चांगलेच पेटले आणि आक्रमक चर्चा झाल्यानंतर विरोधकांनी सरकारचा निषेध करत सभात्याग केला.
मुळात अधिवेशनाच्या प्रारंभीच सभागृहाच्या बाहेर एकीकडे काँग्रेस आमदार केंद्रातील मोदी सरकाविरोधी घोषणा देत असताना दुसरीकडे भाजपा नेते राज्य सरकारविरोधात घोषणा देत होते. काँग्रेस नेत्यांकडून इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली होती. रॅली विधानभवनाजवळ पोहोचताच काँग्रेस आणि भाजपा आमदार आमने-सामने आले.
सभागृहाच्या बाहेर दोन्हीही पक्षांची घोषणाबाजी
इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यासाठी महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर काँग्रेस आमदार सायकलवरुन विधानभवानाकडे रवाना झाले. यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलताना म्हटलं की, “केंद्रातील मोदी सरकारने ज्या पद्दतीने महागाई वाढवण्याचा विक्रम केला आहे त्यामधून सर्वसामान्यांचं जगणं मुश्कील केलं आहे. काँग्रेसच्या वतीने देशभरात विरोध होत आहे. परवा पेट्रोलियम मंत्र्यांनी थंडीमुळे भाव वाढल्याचा जावईशोध लावला. या पद्धतीने वारंवार थट्टा करण्याचा केंद्रातील मोदी सरकारने जो प्रयत्न सुरु आहे, लोकांच्या तोंडातील घास हिसकावून घेण्याचं काम सुरु केलं आहे त्याचा विरोध आम्ही करत आहोत”. “विरोधक इंधन दरवाढीसंबंधी खोटी माहिती पसरवत आहेत. केंद्राने आपलं विश्लेषण जनतेसमोर मांडावं असं असताना पेट्रोलियम मंत्री थंडीमुळे वाढल्याचं सांगत आहेत,” अशी टीका नाना पटोले यांनी केली.
सभागृहात काय झाले ?
आज या अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर अजित पवार यांनी 2020-21 च्या पुरवणी मागण्या सभागृहात मांडल्या. यावेळी विरोधी बाकांवर उभे राहून घोषणाबाजी केली. तसेच ‘दादागिरी नही चलेंगी’च्या घोषणा घेत भाजप नेत्यांनी गोंधळ घातला. यावेळी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ‘समतोल विकासाचा विचार करुन या सरकारने निधीचं वाटप केले आहे का? मला या सभागृहाच्या नियमांनुसार बोलण्याचा अधिकार आहे. मराठवाडा, विदर्भ या राज्याचा भाग आहे. डावपेचात वैधानिक विकास मंडळं अडकता कामा नये. तुम्ही सभागृहातले शरद पवारांचं भाषण जाहीर वाचून पाहा. अजित पवारांनी 15 डिसेंबर 2020 ला आश्वासन दिले होते की, मी वैधानिक विकास मंडळं स्थापन करुन देऊ, त्याला 72 दिवस झाले आहेत, ते करणार आहात की नाही ते सांगा, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला.
त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिले. ‘आमचं सरकार विदर्भ मराठवाडा विकास मंडळ झाले पाहिजे या मताचे आहे. 8 तारखेला बजेटमध्ये विकास मंडळांबद्दल जे ठरले आहे त्याचे आकडे पाहायला मिळतील. आमचे लवकरात लवकर करायचे ठरले आहे. 12 विधान परिषदेची नावे दिली आहेत. ज्या दिवशी ती नावे जाहीर केली जातील त्याचवेळी विकास मंडळं घोषित केली जातील आणि अर्थसंकल्प जेव्हा सादर केला जाईल तेव्हा विकास मंडळांची घोषणा केली जाईल, राजकारण करू नका असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान अजित पवार यांच्या उत्तरानंतरही भाजपने आक्रमकपणे बाजू मांडत ठाकरे सरकारवर हल्लाबोल चालूच ठेवत अखेर या शाब्दिक वादात भाजपने सभागृह त्याग करण्याचा निर्णय घेतला.