Aurangabad News update : पोलीस आयुक्तालयाच्या परवानगी अभावी रखडले बीड बायपासचे काम…

पोलीस आयुक्तालयाच्या शहर वाहतूक शाखेच्या परवानगी अभावी जागतिक बँंक प्रकल्प कार्यालयाकडे असलेले बीड बायपास रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षांपासून रखडले असल्याचा गौप्यस्फोट सूत्रांनी केला.
या विषयीची अधिक माहिती अशी की, झाल्टा फाटा ते महानूभव आश्रम हा रस्ता सहा पदरी करण्याचे काम जागतिक बँंक प्रकल्प कार्यालयाकडे आहे. झाल्टा फाटा ते गुरु लाॅन्स हा रस्ता पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे येतो तर गुरु लाॅन्स ते महानूभव आश्रम हा रस्ता पोलिस आयुक्तालयाकडे येतो. त्यासाठी प्रकल्प कार्यालयाने अधिक्षक कार्यालय आणि आयुक्तालयाकडे रस्त्याचे काम करण्यासाठी वाहतूक नियमन करुन द्या अशी लेखी मागणी दीड वर्षांपूर्वी केली आहे.
दरम्यान जिल्हा पोलिस अधिक्षकांनी एका आठवड्यात परवानगी दिली. त्यानुसार जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या हद्दीतील कामही पूर्ण करण्यात आलेले आहे तर पोलिस आयुक्तालयातील अधिकार्यांना वाहतूक नियमन करुन देण्यासाठी परवानगी देण्यास दीड वर्षांपासून वेळ मिळाला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच या रस्त्याचे काम येत्या २० महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाने दिलेले आहेत. त्यापैकी तीन महिने होऊन गेले आहेत. या प्रकरणात विद्यमान पोलीस आयुक्तांनी लक्ष घातल्यास हे काम लवकर मार्गी लागू शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वाहतूक नियमनाअभावी गेल्या दीड वर्षापासून या रस्त्याचे काम प्रलंबित आहे. या विषयी पोलिस आयुक्त डाँ. निखील गुप्ता यांना विचारले असता ते म्हणाले की, “मला याबाबतपूर्वीचा घटनाक्रम तपासल्याशिवाय बोलता येणार नाही. मी वाहतूक शाखेला प्रकल्पाने वाहतूक नियमना संदर्भात काही पत्रव्यवहार केले आहेत का ? याबाबत माहिती घेतो त्यानंतर यावर स्पष्टीकरण देता येईल.”