दुचाकी चोर जवाहर नगर पोलिसांच्या जाळ्यात चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत

औरंगाबाद : चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आलेल्या दोघांना जवाहरनगर पोलिसांनी सोमवारी सेंट्रल नाका येथे सापळा लावून बेड्या ठोकल्या. सिध्देश प्रविण शिंदे, (२२, रा. रो हाऊस नं.२१, तेजस संस्कृती, पिसादवी) आणि रानू संजय अवचार, (२५, रा. वाकी, ता.सेलु,जि.परभणी, ह.मू. एन-२, हिरा कॉम्पलेक्स, मुकुंदवाडी) असे अटकेतील दुचाकी चोरांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून चोरीच्या पाच दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या असल्याची माहिती जवाहर नगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली.
पुंडलिकनगर व जवाहर नगर भागातून चोरलेल्या दुचाकी विक्रीसाठी दोघेजण सेंट्रल नाका येथील एका गॅरेजवर येणार असल्याची गोपीनिय माहिती जवाहर नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे उपनिरीक्षक वसंत शेळके, जमादार गजेंद्र शिंगणे, विजय अकोले, भाऊराव गायके, पोलीस नाईक प्रदीप दंडवते, विजय वानखेडे, संदीप क्षीरसागर यांनी गॅरेजजवळ सापळा लावला. त्यावेळी सिद्धेश शिंदे आणि रानु अवचार दोघे दुचाकीवर तिथे आले. गॅरेजचा मेकॅनिकने दुचाकी खरेदीचा सोदा केला. कागदपत्राची मागणी करताच त्यांनी कागदपत्रे नसल्याचे सांगितले. त्यावेळी जवाहर नगर पोलिसांच्या विशेष पथकाने त्याना पकडले.
यांच्या दुचाकी मिळाल्या
संजय शिवाजी कवडे ( रा. विष्णूनगर, एमएच-२०-सिव्ही-८४३०), सुधीर पंढरीनाथ सुरडकर (रा. चिकलठाणा, एमएच-२०-इआर-९९९४), साक्षी रविंद्र बुलबुले (रा. कॅनॉट प्लेस, एमएच-२०-बीजी-७९२२), सागर पुंडलिक व्यवहारे (रा. पाथर्डी फाटा, नाशिक, एमएच-१५-एफआर-०७५४), राजेंद्र चंद्रभान शिंदे (रा. ठाकरेनगर, एन-२, मुकुंदवाडी, एमएच-२०-इएच-७३९८)