दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणारा गजाआड

औरंंगाबाद : दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणाऱ्या बाळासाहेब पवार (वय १८, रा.नारेगाव परिसर) याला शहर वाहतूक शाखा पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई १३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सिडको बसस्थानकासमोर करण्यात आली.
शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी विवेक चव्हाण हे आपल्या सहकार्यांसह शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सिडको बसस्थानक चौकात नाकाबंदी मोहिम राबवत होते. त्यावेळी दुचाकी क्रमांक (एमएच-२०-ईएफ-३४११) वर बाळासाहेब पवार हा विद्यार्थी संशयास्पदरित्या फिरत होता. पोलिसांनी बाळासाहेब पवार याला ताब्यात घेवून दुचाकीच्या कागदपत्राविषयी विचारपूस केली असता तो उडवा-उडवीची उत्तरे देत होता. पोलिसांनी खाक्या दाखवून विचारताच त्याने सदरील दुचाकीचा मुळ क्रमांक (एमएच-२०-ईएफ-८४१२) असा असल्याचे सांगितले. तसेच दुचाकीवरील क्रमांक बनावट असल्याची कबूली पोलिसांना दिली. याप्रकरणी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी विवेक चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून बाळासाहेब पवार याच्याविरूध्द एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक मिरा लाड करीत आहेत.