पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

औरंंगाबाद : पेट्रोल भरल्यानंतर पैसे न देता पंपावर काम करणाऱ्या व्यक्तीला मारहाण करुन त्याच्याकडील पैसे हिसकावून नेणाऱ्या टोळक्याने सादर केलेला नियमीत जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एन. माने यांनी फेटाळून लावला आहे.
गणेश राजेंद्र अकोलकर (वय २३), मनोज राजेंद्र अकोलकर (वय १९, दोघे रा. संभाजी कॉलनी, एन-६ सिडको), मधुसूदन बालाजीराव राठोड (वय २२, रा. एफ सेक्टर एन-६ सिडको), अजय विजय निमरट (वय २१, रा. एन-६ सिडको) आणि शुभम धरमसिंग बिडला (वय १९, रा. ई सेक्टर एन-६ सिडको) अशी पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्यांची नावे असून या टोळीला ११ फेबु्रवारी रोजी पोलिसांनी अटक केली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यावर न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायलयीन कोठडीत केली होती. त्यानंतर आरोपींनी नियमीत जामीनीसाठी अर्ज सादर केला होता. प्रकरणात सहायक सरकारी वकील निता किर्तीकर यांनी काम पाहिले. याप्रकरणात अंबरवाडीकर पेट्रोल पंप येथे काम करणारे बोधीवंत काकाजी मगरे (वय ३७, रा. रमानगर, क्रांतीचौक) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, वरील आरोपींविरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.