कुख्यात चोरटा पोलिसांच्या जाळ्यात, ३६ हजाराचा मुद्देमाल जप्त

औरंंगाबाद : रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगाराच्या मुसक्या आवळत पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीचा सोन्याचा नेकलेस व दोन मोबाईल असा एकूण ३६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. शेख गफ्फार उर्फ बबल्या शेख सत्तार (वय ३२, रा.नारेगाव, चमचमनगर) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चोरट्याचे नाव आहे.
रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार शेख गफ्फार उर्फ बबल्या हा नारेगाव परिसरातील पाण्याच्या बंब्याजवळ चोरीचे मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलिस आयुक्त निशीकांत भुजबळ, एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय मांन्टे, पोलिस अंमलदार मुनीर पठाण, रत्नाकर बोर्डे, दिपक शिंदे, नितेश सुंदर्डे, अविनाश दाभाडे, मोटे, सुवर्णा ढाकणे, दिपाली हजारे आदींनी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन च्या सुमारास नारेगाव परिसरात सापळा रचून शेख गफ्फार उर्फ बबल्या याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळून एक चोरीचा नेकलेस व दोन मोबाईल असा एकूण ३६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शेख गफ्फार उर्फ बबल्या याच्याकडून चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.