चोरीच्या घटना रोखण्यासाठी शहर व वाहतूक पोलीसांची संयुक्त मोहीम

औरंंगाबाद : शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर शहर पोलिसांनी वाहनधारकांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. अस्पष्ट किंवा विना क्रमांकाची वाहने, फॅन्सी क्रमांक प्लेट असलेली वाहने पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे यांनी सोमवारी (दि.८) दिली.
शहरात विविध भागात वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दुचाकीनंतर आता चार चाकी वाहने देखील चोरटे लांबवत आहेत. वाढत्या वाहन चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांची विविध पथके दिवस रात्र गस्त घालत आहेत. मात्र, चोरीच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत. त्यामुळे आता पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व ठाण्याचे व वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची संयुक्त पथके तयार करण्यात आली आहेत. सोमवारी शहरातील विविध चौकात विना क्रमांक, अस्पष्ट क्रमांक व फॅन्सी प्लेट असलेल्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत होती. पोलिसांना पाहून अनेक दुचाकीस्वारांची धांदल उडाली असल्याचे यावेळी पहावयास मिळाले.
दरम्यान, शहरात वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी नियमितपणे १६० इ-चलन मशिनद्वारे वाहनाची तपासणी करत आहेत. आजपासून स्थानिक पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना देखील मोहिमेत सामील केले आहे. त्यामुळे आता दररोज शहरात ठिकठिकाणी १६० मशिनद्वारे वाहनांची कसून तपासणी केली जाणार असल्याचे वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त सुरेश वानखेडे यांनी सांगितले.
ई-चलन मशीनची संख्या वाढवणार
वाढत्या वाहन चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने सोमवारी ११० ई-चलन मशीनद्वारे ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात होती. मंगळवारपासून मशीनची संख्या वाढवून १६० करण्यात येणार आहे. हा वाहन चोरी विरोधी अभियानाचा भाग असल्याचे पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी सांगितले.