ई-वे बिलातून करचुकवेगिरी, ५१ लाखांचा दंड वसूल

औरंंगाबाद : अनेक व्यापारी ई-वे बिलातून करचुकवेगिरी करत असल्याचे वस्तु व सेवाकर विभागाच्या पथकाच्या निदर्शनास आले असून त्यानुषंगाने केलेल्या तपासणी मोहिमेत कारवाई करत ५१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. औरंगाबाद विभागांतर्गत ही कारवाई केलेली असून यासंदर्भातील माहिती वस्तु व सेवाकरच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.५) दिली.
वस्तु व सेवाकरच्या औरंगाबाद विभागाने २९ जानेवारीपासून २४ तास ई-वे बिल तपासण्याची मोहीम सुरू केली आहे. व्यापाऱ्यांना मालाची ने-आण करताना ई-वे बिल आवश्यक आहे. १ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा माल असल्यास तसेच मालाची आंतरराज्य वाहतूक करावयाची असल्यास ५० हजार रुपये किमतीच्या मालावर ई-वे बिल १ एप्रिल २०१८ पासून अनिवार्य आहे. अनेक व्यापारी ई-वे बिल तयार करत नसल्याचे वस्तु व सेवाकर विभागाच्या निदर्शनास आले होते. त्याअनुषंगाने अशा करचुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरूध्द २९ जानेवारीपासून धडक मोहीम राबवण्यात येत आहे. आजपर्यंत १४ हजारांपेक्षा अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली. यातील ई-वे बिल नसणाऱ्या ५२ वाहनांकडून ५१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी औरंगाबाद विभागाचे राज्यकर सहआयुक्त आनंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर उपायुक्त रवींद्र जोगदंड, सहायक राज्यकर आयुक्त मकरंद कंकाळ, माधव कुंभारवाड, धनंजय देशमुख, तुषार गावडे तसेच औरंगाबाद, जालना, बीड येथील अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत आहेत.