लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार जीम चालकाविरुध्द गुन्हा दाखल

औरंंगाबाद : इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून विवाहित जीम चालकाने विवाहितेवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरुन जीम चालक कार्तिक राजू लोकल (रा. कडा कार्यालय क्वार्टर, सेव्हन हिल) याच्याविरुध्द जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिल कॉर्नर परिसरातील एका ३० वर्षीय विवाहितेचे पतीसोबत न्यायालयात घटस्फोटासाठी वाद सुरू आहे. गेल्या २९ मार्च २०२० मध्ये या विवाहितेची कार्तिक लोकल याच्यासोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली. या ओळखीतून दोघांचे सूत जुळले. त्यानंतर विवाहित असलेल्या कार्तिक लोकल याने विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून १२ मे २०२० पासून २६ जानेवारी २०२१ पर्यंत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. विवाहिता त्याच्याकडे वारंवार लग्नासाठी मागणी करत होती. मात्र, कार्तिक लोकल तिला टाळत होता. त्यातच कार्तिक पुर्वीपासून विवाहित असल्याचे विवाहितेला समजले. त्यावरुन दोघांचे २६ जानेवारीला कडाक्याचे भांडण झाले. यावेळी कार्तिक लोकलने तिला शिवीगाळ व मारहाण करुन तिची दुचाकी फोडली. या घटनेनंतर गुरुवारी रात्री विवाहितेने जवाहरनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रध्दा वायदंडे या करत आहेत.