राज्यात पहिल्या टप्प्यात ५ हजार पोलीस भरती होणार

राज्यात साडेबारा हजार पोलिसांची पदभरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असला तरी त्यापैकी पहिल्या टप्प्यात पाच हजार पोलिसांची पदभरती करण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित साडेसात हजार पोलिसांची पदभरती करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात असून महिलेवरील दुर्देवी अत्याचाराच्या घटनेनंतर आरोपीला आजीवन कारवासाची शिक्षा झाली असेल तर त्याला फाशीची शिक्षा होण्याच्या दृष्टीकोणातून प्रयत्न केले जात आहे. न्यायालयातही अशी प्रकरणे तातडीने निकाली निघावी, याकरिता आताच्या कायद्यात बदल करून त्याचे रुपांतर शक्ती कायद्यात करण्यात येत आहे. या कायद्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. यासाठी सर्वपक्षीय २१ आमदारांची समिती गठित करण्यात आली असून, शक्ती कायद्याचे अंतिम प्रारुप तयार करणे सुरू आहे. अंतिम प्रारूप मंजूरीकरिता विधानसभा व विधानपरिषेदेच्या होऊ घातलेल्या अधिवेशनात ठेवण्यात येणार असल्याचेही गृहमंत्री देशमुख म्हणाले. पत्रपरिषदेला हर्षवर्धन देशमुख, सुरेखा ठाकरे, सुनील वऱ्हाडे, राजेंद्र महल्ले आदी उपस्थिती होते.
कोरोना कर्तव्य बजवताना ३३० पोलीस शहीद
कोरोना काळात पोलिसांनी उत्तम कामगिरी केली. कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी राज्यातील पोलीस सक्षम असून यावेळी कोरोना योद्धा म्हणून राज्यात ३३० पोलीस शहीद झाल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.