सहकार अधिकारी लाचेच्या सापळ्यात अडकला २० हजाराची लाच घेतांना पकडले

औरंंगाबाद : संस्थेविरुध्द तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने त्या संस्थेचा सकारात्मक अहवाल देण्यासह प्रशासक न नेमण्यासाठी वीस हजाराची लाच स्विकारणा-या सहकार अधिका-याला मंगळवारी (दि.२) दुपारी साडेबाराच्या सुमारास अॅन्टी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडले. वाल्मिक माधव काळे (वय ५६, रा. केसापुरी, ता. कन्नड) असे सहकार अधिका-याचे नाव आहे.
मत्स्य व दुग्ध कार्यालयात सहकार अधिकारी म्हणून वाल्मिक काळे कार्यरत आहे. एका संस्थेविरुध्द सहकार अधिकारी काळेकडे तक्रारी अर्ज आला होता. या अर्जाच्या अनुषंगाने संस्थेविरुध्द सकारात्मक अहवाल व संस्थेवर प्रशासक न नेमण्यासाठी काळेने संस्थेच्या सदस्याकडे २८ जानेवारीला वीस हजाराच्या लाचेची मागणी केली होती. यावरुन संस्थेच्या सदस्याने अॅन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने अॅन्टी करप्शन ब्युरोने मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास जालना रोडवरील श्री निकेतन कॉलनीकडे जाणा-या रस्त्यावर सापळा रचला. यावेळी संस्थेच्या सदस्याकडून वीस हजाराची लाच स्विकारताना अॅन्टी करप्शन ब्युरोचे निरीक्षक संदीप राजपूत, जमादार अरुण उगले, दिगंबर पाठक व प्रकाश घुगरे यांनी काळेला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुध्द क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.