डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांची गय करणार नाही – पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता

औरंंगाबाद : रूग्णांचे प्राण वाचविण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय करणार नाही असे आश्वासन पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी शहरातील डॉक्टरांना दिले आहे. पोलिस आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी (दि.२) शहरातील वैद्यकीय व्यावसायीकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत डॉक्टरांना येणाऱ्या विविध अडचणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांच्या संकल्पनेतून अ कप ऑफ टी विथ युवर सीपी ही मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून मंगळवारी शहरातील प्रतिष्ठीत वैद्यकीय व्यवसायीकांची बैठक पोलिस आयुक्तालयाच्या सभागृहात पार पडली. पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस विशेष शाखेचे सहाय्यक आयुक्त अशोक बनकर, विशेष शाखेचे निरीक्षक प्रमोद खटाणे, मराठवाडा डॉक्टर असोसिएशनचे डॉ.हिमांशु गुप्ता, एमजीएमचे डॉ.प्रविण सुर्यवंशी, हेडगेवार हॉस्पीटलचे डॉ.प्रविण ठाकरे, माणिक हॉस्पीटलचे डॉ.प्रमोद लोणीकर, बजाज हॉस्पीटलच्या डॉ.नताशा वर्मा, सिग्मा हॉस्पीटलचे डॉ.उन्मेष टाकळकर, एशियन हॉस्पीटलचे डॉ.शोएब हाश्मी, एमआयटी हॉस्पीटलचे डॉ.संतोष ढाकणे आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉक्टरांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येवून डॉक्टरांच्या अडचणी सोडविण्यावर भर देण्यात येईल असे आश्वासन पोलिस आयुक्तांनी उपस्थितांना दिले.
पोलिसांना मिळणार उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा
सतत कामाच्या व्यस्ततेमुळे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना विविध प्रकारचे दुर्धर आजार जडले आहेत. दुर्धर आजारी असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जाईल असे आश्वासन मराठवाडा डॉक्टर असोसिएशनचे डॉ.हिमांशु गुप्ता यांनी पोलिस आयुक्तांना दिले.
कैद्यांचे बनावट जामीनपत्र कारागृहाच्या पेटीत, तिघांविरूध्द गुन्हा दाखल
औरंंगाबाद : जामिनावर मुक्त होण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाचे तीन बनावट जामीनपत्र तयार करुन कारागृहाच्या पेटीत टाकून शासनाची फसवणूक केलेल्या तीन कैद्यांविरुध्द हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उध्दव उर्फ उद्या मजल्या भोसले, आसाब दस्तगीर शेख आणि विशाल मिलिंद पारधे अशी तिघांची नावे आहेत.
बीड जिल्ह््यात गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या उध्दव भोसले, आसाब शेख आणि विशाल पारधे यांच्याविरुध्द न्यायालयाने मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. ते गेल्या काही दिवसांपासून हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत आहेत. या तिघांनी संगणमत करुन न्यायालयाचे बनावट जामीनपत्र तयार केले. न्यायालयाने तिघांना जामीन दिल्याचे पत्र हर्सूल कारागृहातील पेटीत टाकण्यासाठी स्वत:जवळ बाळगत होते. हा प्रकार उघडकीस आल्यावरुन तुरूंग अधिकारी इर्शाद याकुब सय्यद (वय ३५, रा. मुजफ्फरनगर) यांच्या निदर्शनास आला. त्यावरुन सोमवारी सायंकाळी तिघांविरुध्द हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक अतुल ठोकळ करत आहेत.
बनावट जन्म दाखल्यावर सैन्यात भरती, सहा उमेदवाराविरूध्द गुन्हा दाखल
औरंंंगाबाद : बनावट जन्म दाखला सादर करुन मराठवाड्यातील सहा उमेदवारांनी सैनिक भरतीत सहभाग घेतला. हा प्रकार उघडकीस आल्यावरुन उमेदवारांविरुध्द छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छावणीतील सैन्य दलात २०१६ ते २०२० या काळात भरती प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी विजय नामदेव मनगटे (रा. वाकड, ता. कन्नड), शंकर सुरेश वाघ, महाबळेश्वर पुंडलिकराव केंद्रे (रा. दैठणा, ता. कंधार, जि. नांदेड), प्रशांत रामचंद्र महाले (रा. दुसाने, ता. साक्री, जि. धुळे), किरण कौतीक भाडगे (रा. वाकड, ता. कन्नड) आणि अनीस अलाऊद्दीन शेख (रा. माळी गल्ली, परभणी) यांनी भरती कार्यालयाला बनावट जन्म दाखले सादर केले. हा प्रकार नुकताच उघडकीस आल्यावरुन कर्नल तरुणसिंग भगवानसिंग जमवाल (वय ४०, रा. छावणी) यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक शेख करत आहेत.
प्लॉट नावावर करण्यावरुन मारहाण
औरंंगाबाद : प्लॉट नावावर करण्यावरुन दुचाकीवर जाणा-या व्यापा-याला चौघांनी मारहाण करुन बळजबरी एमआयएमच्या माजी नगरसेविका पतीच्या कार्यालयात नेऊन मारहाण केली. तसेच बॉन्ड पेपरवर सह््या घेतल्या. ही घटना ६ जानेवारीला सायंकाळी पाच ते रात्री आठच्या सुमारास कटकट गेट येथे घडली.
अब्दुल सलाम अब्दुल अजीज (वय ४२, रा. समी कॉलनी) हे दुचाकीने घरी जात होते. त्यावेळी गणेश बाबुराव जाधव (वय ४०, रा. मयूर पार्क) रशीद बिल्डर, एजाज आणि जाबेर यांनी अब्दुल सलाम यांना बळजबरीने माजी नगरसेविका पती सलीम सहारा यांच्या कार्यालयात नेले. तेथे बसवून ठेवत त्यांचे भाऊ अब्दुल रज्जाक याला बोलावून घेण्यास सांगितले. तसेच त्याच्या नावावरील प्लॉट गणेश जाधव याच्या नावे करण्यासाठी मारहाण केली. त्यानंतर दुचाकीवर बसवून उच्च न्यायालयाजवळ नेत अब्दुल रज्जाक यांच्या नावावरील प्लॉट बळजबरी गणेश जाधवच्या नावे केला. त्यावरुन सोमवारी रात्री नऊच्या सुमारास जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक व्ही. एस. जाधव करत आहेत.