औरंगाबाद शहरात तरुण बौद्ध भिक्कूचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न

देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असताना औरंगाबाद शहरात एका तरुण बौद्ध भिक्कूने विभागीय आयुक्त कार्यालय येथे विष प्राशन करून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांच्या आईच्या घराच्या मालकी हक्काच्या तक्रारीवर पोलीस कारवाई करत नसल्याने त्यांनी हे कृत्य करीत असल्याचे सांगितले. दरम्यान त्यांच्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न केला जात असताना पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्यांना ताब्यात घेतल्याने पुनः त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्यांना उपचारार्थ घाटी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
या विषयीची अधिक माहिती की, अरुण माडुकर यांचे घर एका मध्यस्थाच्या माध्यमातून बेबिबाई सिरसाट यांनी घेतले होते. पुढे त्यांच्या पतीचे निधन झाले . तरीही ठरल्याप्रमाणे त्यांनी कर्ज, उसणवारी करून रक्कम अदा केली तरीही त्यांचे घर नावावर करून देण्यास टाळाटाळ करीत आहेत. बेबिबाई सिरसाट या विधवा असून परित्यक्ता मुलीसोबत त्या मुकुंदवाडी, म्हाडा कॉलनीत राहतात. त्यांचा मोठा मुलगा बौद्ध भिक्कू असून इतर दोन मुले आपल्या परिवारासह इतरत्र राहतात. दरम्यान अर्जदार बेबिबाई सिरसाट यांनी गैर अर्जदारांच्या विरोधात पोलिसात तक्रारी करूनही पोलिस कारवाई करीत नाहीत. त्यामुळे त्रस्त होऊन बौद्ध भिक्कू भन्ते बुद्धपाल रा.मुकुंदवाडी (राजनगर) यांनी आज विभागीय आयुक्तालयात प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने त्यांचे प्राण वाचले. तरीही त्यांनी विषारी द्रव्य घेतलेच. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
अर्जदारच्या म्हणण्यानुसार दि . १४ आँगस्ट च्या सुमारास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे परंतु निराश्रीत असलेल्या एका विधवा महिलेच्या तक्रारीवर या प्रशासनाकडून काहीच कार्यवाही झाली नाही. याशिवाय त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशन एम.आय.डि.सी चिखलठाणा येथेही संबंधित आरोपी विरूध्द रीतसर तक्रार दाखल केली. पण बेबिबाई सोपान शिरसाट या दलित विधवा महिलेच्या तक्रारीवर पोलीस प्रशासनाकडून काहीच कार्यवाही झाली नसल्याने त्यांना लाखोचा गंडा घालणारे माडुकर दाम्पत्य आणि मध्यस्थ उजळमाथ्याने फिरत आहेत.
बेबीबाई शिरसाट मात्र जवळपास दहा लाखाच्या कर्जाच्या ओझ्याने खचून त्यांची प्रकृती खालावली असून त्या न्यायाच्या प्रतिक्षेत प्रशासनाच्या कार्यवाहिची वाट बघत आहेत. पण त्यांना न्याय मिळत नाही. पोलीस स्टेशनला धाव घेतली असता, अधिकारी कधी सुट्टीवर गेल्याचे कळते, तर कधी बदली झाली… असे कारण देवून, संबंधीत गैर अर्जदारावर कसल्याही प्रकारची कार्यवाही करण्याचे पोलीस प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. यात विशेष बाब म्हणजे अशी की बेबबाई शिरसाट ची आर्थिक फसवणूक व लुबाडणूक करणारे माडुकर दाम्पत्याचे परिवार उच्चशिक्षीत असून त्याचे मुले व सुना पेशाने वकिलकीच्या व्यवसाय आहेत.
परभणी आणि साताऱ्यातही दोन तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न
दरम्यान औरंगाबाद बरोबरच परभणी आणि साताऱ्यातही दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनोहर सावंत नावाच्या तरुणाने स्वतःला पेटवून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. जातीवादी लोकांनी सोनगाव येथील घर उद्ध्वस्त केले असल्याचा आरोप सावंत यांनी केला.
‘मी अनुसूचित जातीचा असल्याने प्रशासन आणि पोलीस प्रशासन सहकार्य करत नसल्याने हे कृत्य केल्याचे सावंत यांनी सांगितले. पेट घेतलेल्या अवस्थेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने पळत असताना पोलिसांनी त्यांना अडवले आणि आग विझवली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
तर परभणी महापालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात शाहिद खान या 30 वर्षीय तरुणानेआत्मदहनाचा प्रयत्न केला. महानगरपालिकेमध्ये झेंडावंदन तयारी सुरू असताना ही घटना घडली. अंगावर पेट्रोल टाकून पेटवून शाहिद खानने पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. वेळीच सुरक्षा रक्षक आणि मनपा कर्मचाऱ्यांनी रोखल्याने पुढील प्रकार टळला. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.