#Crime News : गांजा खरेदीसाठी आलेल्या चार जणांसह सह विक्रेता गजाआड

औरंगाबाद, : गांजा खरेदीसाठी मुंबईतून आलेल्या चार आरोपींसह पाच जणांना पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून १५ किलो १६ ग्रॅम गांजासह साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रविवारी (दि. २४) चंपाचौक ते चेलीपुरा रस्त्यावर शहाबाजार भागात ही कारवाई करण्यात आली.
अब्दुल गफूर खान अब्दुल करीम खान (३७, रा. गल्ली क्र. १, कैसर कॉलनी), इम्रान मोहंमद हनिफ बलोच (३७), शफिक नबी पटेल (२८,), अब्दुल गणी शहांगीर शेख (२३) आणि फरजाना शफीक पटेल (३२, सर्व रा. जनता कॉलनी, गिलबडील रोड, अंधेरी वेस्ट, मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थांची तस्करी करणारा रेकॉर्डवरील आरोपी अब्दुल गफूर खान हा मुंबईतून आलेल्या इम्रान व त्याच्या साथीदारांना मोठ्या प्रमाणात गांजाचा पुरवठा करणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तांचे जनसंपर्क अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक राहुल रोडे यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी परवानगी घेऊन सापळा रचला. त्यांनी मुंबईतून आलेले वाहन (क्र. एमएच ०४, सीएम ६५३५) यावर पाळत ठेवली. त्यात एका महिला आणि तीन पुरुष होते. हे वाहन चंपाचौक ते चेलीपुरा परिसरात होते. पथकाने तेथे जाऊन सापळा रचला. काही वेळाने एक मोपेड (क्र. एमएच २०, एफएच ९२२२) वरुन अब्दुल गफूर खान आला. त्याने चार गोण्यांमधून आणलेला गांजा मुंबईतून आलेल्या वाहनात ठेवला. खात्री पटताच पथकाने छापा मारून सर्वांना जागेवरच पकडले. त्यांच्याकडून तीन लाखांचा १५ किलो गांजा, ७५ हजारांची मोपेड, पाच लाखांची इनोव्हा कार, पाच मोबाइल आणि रोकड असा नऊ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध इम्रान खान यांच्या फिर्यादीवरुन सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.