धार्मिक पोस्टर काढून चौकात तणाव करणाऱ्यावर कारवाई करा, भाजपची पोलिस आयुक्तांकडे मागणी

औरंंगाबाद : गारखेडा परिसरातील हिंदुराष्ट्र चौकातील एक धार्मिक पोस्टर काढल्यानंतर काही काळ सोमवारी (दि.१८) तणाव निर्माण झाला होता. धार्मिक पोस्टर काढुन ते कचरा गाडीत टाकून नेणार्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांच्याकडे करण्यात आली.
गेल्या दोन ते तीन दिवसापासून शहरात भाजप आणि शिवसेना यांच्या पोस्टर वॉर रंगले आहे. दोन दिवसापूर्वी भाजपच्या वतीने शहराच्या विविध भागात नमस्ते संभाजीनगर नावाचे लावलेले फलक मनपाने काढले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी गारखेडा परिसरातील हिंदुराष्ट्र चौकातील एक धार्मिक पोस्टर काढुन ते मनपाच्या कचरा गाडीतून नेत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ कचरा गाडीवाल्याला थांबवून कचरा गाडीत ठेवलेले धार्मिक पोस्टर काढुन घेतले. यावेळी कचरा गाडीवरील कर्मचारी आणि नागरिक यांच्यात शाब्दीक चकमक उडून काही काळ तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, भाजपचे माजीमंत्री आ. अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, प्रदेश कार्यकारीणीचे पदाधिकारी अनिल मकरीये, माजी उपमहापौर संजय जोशी, भाजप महिला मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्षा अमृता पालोदकर, कार्याध्यक्षा मनिषा भंसाळी आदींनी सोमवारी सायंकाळी पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांची भेट घेवून धार्मिक पोस्टर काढुन ते कचरा गाडीतून नेणार्यावर आणि मनपाच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.