सामाजिक न्यायमंत्री मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजप महिला मोर्चाची निदर्शने

औरंंगाबाद : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईत राहणार्या एका महिलेने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला असून मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करीत भाजप महिला मोर्चाच्या वतीने सोमवारी (दि.१८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. भाजप महिला मोर्चाच्या शहर जिल्हा अध्यक्षा अमृता पालोदकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गेल्या आठवड्यात मुंबईत राहणार्या महिलेने जीवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करीत मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर मुंडे यांनी सोशल मिडियावर पोस्ट टाकून त्यांनी पीडित महिलेच्या बहिणीसोबत आपले विवाहबाह्य संबंध असल्याची कबूली देत यातून त्यांना दोन आपत्य असल्याचे सांगितले. तसेच आपल्या विवाहबाह्य संबंधाची माहिती आपल्या कुटुंबियानाही असल्याची कबूली त्यांनी आपल्या पोस्टमध्ये दिली आहे. धनंजय मुंडे यांनी दिलेल्या कबूलीमधुन समाजात चुकीचा संदेश गेला असल्याचे म्हणत भाजप महिला मोर्चोने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी महिला मोर्चाच्या पदाधिकार्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिले.