PuneNewsUpdate : वादग्रस्त संभाजी भिडे यांना वढू बुद्रुक येथे थांबण्यास पोलिसांचा मज्जाव

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांना शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळावर थांबण्यास मज्जाव केला. पोलिसांनी रोखल्यानंतर संभाजी भिडे त्या ठिकाणावरुन निघून शिरुर तालुक्यातील वाजेवाडी येथे एका दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला भेटले आणि पुण्याकडे रवाना झाले. भीमा कोरेगाव आणि वढू बुद्रुक येथील दंगलप्रकरणात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांचा हात असल्याचा आरोप झाल्यानंतर दंगलीपूर्वीपासून सहा वर्ष भिडे या परिसरात आले नसल्याचे सांगितले जाते .
दरम्यान शनिवार दि ९ रोजी अचानक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत संभाजी भिडे आले होते. याबाबत शिक्रापूर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस समाधीस्थळी दाखल होऊन भिडे यांना वढू बुद्रुकला थांबण्यास मज्जाव करण्यात आला आहे. भीमा कोरेगाव आणि वढू बुद्रुक येथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची व घटनेची गोपनीय माहिती संकलीत करण्याचे काम सुरू असल्याने या परिसरात भिंडेना थांबण्यास मज्जाव करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी सांगितले.