जिओ कंपनीच्या डिलरशीपचे आमिष दाखवून सव्वा कोटींचा गंडा

वेगवेगळ्या ठिकाणी जिओ कंपनीची डिलरशीप देण्याचे आमिष दाखवून चौघांनी बनावट कागदपत्राआधारे अनामत रक्कम म्हणून रोखीने व्यापा-याकडून तब्बल एक कोटी दहा लाख रुपये उकळून त्याला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २५ डिसेंबर २०१८ ते ७ जून २०१९ या काळात औरंगाबाद किराडपुरा भागातील रहोनिया कॉलनीत घडला आहे. याप्रकरणाचा तपास सुरू असताना आर्थिक गुन्हे शाखेने चौघांना अटक केली आहे. या चौघांना शुक्रवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. एफ. पुराणउपाध्येय यांनी १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शेख इर्शाद शेख फारुख (२६, रा. हिदायत नगर, कमळापुर रोड, वाळुज), मोहसीन खान गुलाब खान पठाण (३०, रा. बजरंग चौक, एन-७, सिडको), तौसिफ खान युसूफ खान (२३, रा. रशीदपुरा) आणि शेख मोहम्मद आमेर मोहम्मद नईमुल्ला (२२, रा. गल्ली क्र. ३, रहेमानिया कॉलनी) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर सय्यद अकबर (रा. जिन्सी) हा फरार आहे.
मुबारक बिन हबीब अलजावरी (३८, रा. घर क्र. ८/२३/४९६, गल्ली क्र. बी-२ रहेमानिया कॉलनी, किराडपुरा) यांचे सन-२००४ पासून एन-४, सिडको भागात महाराष्ट्र गॅरेज नावाने स्पेअर पार्ट विक्री व दुचाकी वाहन दुरुस्तीचे गॅरेज आहे. मावसभाऊ अमर बिन कबीर बातोक याच्या ओळखीतून मुबारक हे जिओ ईन्फोकॉम कंपनीत नोकरीला असलेल्या शेख इर्शादच्या संपर्कात आले. गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉलमध्ये कामाला असताना इर्शादने त्यांना सिडको, कॅनॉट प्लेसमधील जिओ कंपनीची डिलरशीप निघणार आहे. त्यामध्ये जिओ कंपनीचा मोबाइल हॅन्डसेट, सिमकार्ड व कॉडस्ची ग्राहकांना विक्री करता येऊ शकते. या कंपनीची डिलरशीप हवी असेल तर सांगा असे म्हणत इर्शादने त्यांना जाळ्यात ओढले. आॅगस्ट-२०१८ मध्ये मुबारक हे गॅरेजवर जात असताना सकाळी दहाच्या सुमारास अमर बातोक व त्याच्या मित्रांनी पुन्हा इर्शादकडे जिओ कंपनीच्या डिलरशीपबाबत बोलण्यास सांगितले. त्यानंतर नोव्हेंबर-२०१८ मध्ये इर्शादने मुबारक यांच्या मोबाइलवर संपर्क साधून त्यांना कॅनॉट प्लेसमध्ये जिओ कंपनीची डिलरशीप निघाली आहे. त्यासाठी तुम्ही सकाळी घरी या असे सांगितले. त्यानंतर दुस-याच दिवशी मुबारक यांनी इर्शादचे घर गाठले. तेव्हा त्याने डिलरशीपसाठी ४० लाख रुपये कंपनीकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा करावे लागतील असे सांगितले. त्यावर मुबारक यांनी कुटुंबियांशी चर्चा करुन सांगतो असे इर्शादला म्हणाले. कुटुंबियांशी चर्चा झाल्यानंतर डिलरशीप घेण्याचे ठरले. डिसेंबर-२०१८ च्या तिस-या आठवड्यात इर्शाद हा मुबारक यांच्या घरी गेला. तेव्हा त्याने हा शेवटचाच महिना आहे. याच आठवड्यात पैसे जमा करावे लागतील नसता डिलरशीप मिळणार नाही. त्यावरुन मुबारक यांनी थोडेफार पैसे जमा असल्याचे सांगत अगोदर कंपनीच्या कार्यालयात येतो. तसेच संबंधीत अधिका-यांना भेटून खात्री करतो. नंतर पैसे देतो असे म्हटल्यावर इर्शादने कार्यालयात बोलावून घेतले. पुढे मुबारक यांनी २५ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी अकराच्या सुमारास गारखेडा परिसरातील रिलायन्स जिओ इन्फोकॉम कार्यालय गाठले. या कार्यालयात गेल्यावर तेथे उभ्या असलेल्या चौघांनी सर्व जिओ कंपनीचे अधिकारी आहेत. असे सांगत त्यांनी पुण्याच्या मुख्य कार्यालयाचे उमेश दुबे, निलेश अत्रे आणि मंगेश देशमुख यांनी कंपनीचे व्यवस्थापक शेख नदिम यांची ओळख करुन दिली. त्यावेळी नदिम याने आपल्याकडे सगळे काम आहे. यावेळी इर्शाद, दुबे, अत्रे, देशमुख आणि नदीम यांनी डिलरशीप संदर्भात माहिती दिली. त्यामुळे मुबारक यांचा पाचही जणांवर विश्वास बसला.
इन्कम टॅक्सची दाखवली भिती……
मुबारक यानी पाचही जणांनी इन्कम टॅक्सची भिती दाखवत ४० लाख रुपयांची अनामत रक्कम रोखीने जमा करा सांगितले. तसेच २६ डिसेंबर २०१८ पर्यंत रक्कम जमा करा असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे मुबारक यांनी मित्र व नातेवाईकांकडून जमा केलेले दहा-दहा लाख रुपये इर्शादला दिले. त्यानंतर दुस-या दिवशी डिलरशीप संबंधातील करारनाम्याचे पत्र मुबारक यांना देण्यात आले. या करारनाम्यावर मुबारक यांची देखील स्वाक्षरी घेण्यात आली. पुढे २८ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी मुबारक यांनी इर्शादला ११ लाख रुपये दिले. ३१ लाख रुपये मिळाल्यानंतर मुबारक यांना डिलरशीपसाठी ३७ लाख रुपये कंपनीकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा करावी लागेल असे सांगण्यात आले.
इतर जिल्ह््यातही डिलरशीपचे आमिष…
औरंगाबादसह जालना जिल्ह््यासाठी देखील योजना असल्याचे सांगितल्यामुळे मुबारक यांनी सासरे व इतर नातेवाईकांना माहिती दिली. त्यानुसार, मुबारक यांनी टप्प्याटप्प्याने कॅनॉट प्लेस, सिडको, औरंगाबाद जिल्हा, जालना जिल्हा व छावणी विभागाच्या डिलरशीपसाठी एकूण एक कोटी १० लाख रुपये इर्शाद व पुण्यातील अधिका-यांकडे जमा केले. डिलरशीपसाठी खोटे व बनावट कागदपत्र दिल्याचे निदर्शनास आल्यावर मुबारक यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून तक्रार दिली.
अधिकारी निघाले तोतया…
डिलरशीप मिळत नसल्यामुळे मुबारक यांनी जिओचे पुण्यातील कार्यालय गाठले. तेव्हा अत्रे, दुबे आणि देशमुख नावाचे कोणतेही अधिकारी तेथे नसल्याचे समोर आले. तर हे जिओचे अधिकारी नसून, तोतया तसेच शहरातील असल्याचे समोर आले. त्यावरुन गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी शोध घेत चौघांच्या सायंकाळी मुसक्या आवळल्या. It