CoronaNewsUpdate : जाणून घ्या राज्यात कुठे होत आहे ड्रायरनचा दुसरा टप्पा ?

कोरोना प्रतिबंधिक लसींच्या ड्राय रनचा दुसरा टप्पा आज देशभरात पार पडत आहे. त्यानुसार महाराष्ट्रात देखील ड्राय रन होणार आहे. राज्यातील ३० जिल्हे आणि २५ महापालिकांच्या हद्दीत हे ड्राय रन होणार आहे. या मोहिमेसाठी सर्व यंत्रणा सज्ज असून विविध ठिकाणी या ड्राय रनला सुरुवातही झाली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार , केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज (८ जानेवारी) महाराष्ट्राच्या ३० जिल्ह्यांत आणि २५ महापालिका क्षेत्रांमध्ये करोना लसीकरणाचं ड्राय रन केलं जात आहे. प्रत्येक जिल्ह्यातील तीन आरोग्य केंद्र आणि मनपातील एका आरोग्य केंद्रावर हे ड्राय रन केलं जाणार आहे. यापूर्वी २ जानेवारी रोजी पुणे, नंदुरबार, जालना आणि नागपूर जिल्ह्यात ड्राय रन करण्यात आलं होतं.
दरम्यान, आज पुणे, मुंबई, औरंगाबाद, नांदेड येथे ड्राय रनला सुरुवात झाली आहे. या ड्राय रनच्या प्रक्रियेनुसार, सुरुवातीला तुमची पडताळणी केली जाईल. त्यानंतर तुम्हाला प्रतिक्षा कक्षात पाठवण्यात येईल. तुमचा नंबर आल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष लसीकरण कक्षात प्रवेश दिला जाईल. या कक्षात लस दिल्यानंतर तुम्हाला अर्धातास निरीक्षण कक्षात ठेवण्यात येईल. या ठिकाणी तुम्हाला लसीकरणाचा काही त्रास होतो आहे का? याचं निरीक्षण केलं जाईल. नवी मुंबईमध्ये नेरुळच्या पालिका रुग्णालयात ड्राय रनला सुरुवात झाली आहे. तर मुंबईत बीकेसीतील जम्बो कोविड रुग्णालयातही ड्राय रन सुरु झाले आहे. त्याचबरोबर नांदेड शहरातील जंगमवाडी रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, शंकरराव चव्हाण सामान्य रुग्णालय, मेडखेड येथील मुगट प्राथमिक आरोग्य केंद्र या पाच ठिकाणी ड्राय रनला सुरुवात झाली आहे.