काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी कराड तालुक्यातील उंडाळे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
विलासकाका पाटील उंडाळकर यांनी १९६२ मध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. वीलासकाकांनी सलग 35 वर्षे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. आपल्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी विविध खात्यांचे मंत्रिपद सांभाळले होते. कराड दक्षिण मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व करत असताना त्यांना सहकार, दुग्धविकास, पशुसंवर्धन, मदत व पुनर्वसन खात्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली होती.
याचबरोबर, विलासकाका पाटील उंडाळकर यांनी सहकारी क्षेत्रातही मोठे काम केले असून अनेक सहकारी संस्था उभारल्या आहेत. त्यांच्या जाण्याने कराड, साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत आहे.