AurangabadCoronaUpdate : महिलेपाठोपाठ आणखी एक ब्रिटन रिटर्न तरुण कोरोना पॉझिटिव्ह , पाच जणांचा तपस लागेना

औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या कमी होत असताना, ब्रिटनहून आलेलय महिलेपाठोपाठ आणखी एक २९ वर्षीय तरूण करोनाबाधित आढळला आहे. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान ब्रिटनहून आलेली ५७ वर्षीय एक महिला दोन दिवसांपूर्वी करोना पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आता ब्रिटनहून परतलेले दोघे जण करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्या चाचणीच्या रिजल्टकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.
केंद्राच्या सूचनेनंतर ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोना विषाणूच्या नवीन प्रकाराने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. त्यामुळे देश आणि राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ब्रिटनहून आलेल्या प्रत्येक नागरिकाची आरटीपीसीआर करोना चाचणी करा असे आदेश शासनाने स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार औरंगाबाद महापालिकेने विमानतळावरुन माहिती घेतली आहे. २५ नोव्हेंबरपासून २४ डिसेंबरपर्यंत ४४ व्यक्ती ब्रिटनहून औरंगाबादेत आल्याचे या माहितीच्या आधारे स्पष्ट झाले आहे. त्यातील ३३ व्यक्ती औरंगाबाद शहरातील आहेत. ३३ पैकी शुक्रवारी ५७ वर्षीय एक महिला करोना पॉझिटिव्ह आढळून आली, तिच्यावर धूत हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत.
दरम्यान आज रविवारी २९ वर्षीय तरुण करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. तो आरेफ कॉलनी येथील रहिवासी असून १५ डिसेंबर रोजी तो ब्रिटनहून औरंगाबादेत आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. त्या तरुणाची काल आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती, त्यात तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय ब्रिटनहून आलेल्या तेरा नागरिकांचा महापालिकेला ठावठिकाणा लागत नव्हता, त्यामुळे त्या नागरिकांची नावे त्यांच्या पासपोर्ट क्रमांकासह महापालिकेने पोलिसांकडे दिली होती. पोलीस आपल्याला शोधून काढतील या भीतीने १३ पैकी आठ जणांनी स्वत:हून पुढे येत, कोरोना चाचणी करून घेतली, पाच जणांचा मात्र शोध अद्याप लागलेला नाही.