MaharashtraNewsUpdate : एकनाथ खडसे म्हणाले आधी “ईडी”चे होऊन जाऊ द्या मग “सीडी” विषयी बोलेन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना भोसरी येथील भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने नोटीस बजावल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आपणास ईडीची नोटीस मिळाल्याचे सांगून ते म्हणाले कि , बुधवार दि. ३० मला मुंबईत चौकशीला बोलावण्यात आले आहे. ईडी चौकशीला मी सामोरा जाणार आहे. आणि ईडीला सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. या प्रकरणात आपली आधी चार वेळा चौकशी झाली असून आता पाचव्यांदा हि चौकशी होत असल्याचेही ते म्हणाले.
आपल्या मुक्ताई निवासस्थानी एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ईडीच्या नोटिशीबाबत स्पष्टीकरण देत संभ्रम दूर केला. आपल्याला आजच भोसरीतील भूखंड प्रकरणी ईडीची नोटीस मिळाल्याचे त्यांनी सांगितले. खडसे पुढे म्हणाले की, भोसरी एमआयडीसीतील भूखंडाचा व्यवहार माझ्या पत्नीच्या नावाने झाला आहे. त्यात माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. आता याच भूखंडाच्या संदर्भात मला ईडीने नोटीस बजावली आहे. याच प्रकरणाची यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, आयकर विभाग तसेच न्यायमूर्ती झोटिंग समितीकडून चारवेळा चौकशी झाली आहे. प्रत्येक वेळी आपण आवश्यक ती माहिती व कागदपत्रे सादर केली आहेत. त्यानुसार मला क्लीन चिट देखील मिळाली आहे. आता ईडीकडून पाचव्यांदा या प्रकरणाची चौकशी होणार आहे. आताही मी चौकशीला सामोरा जाणार आहे. ईडीला पण आधीच्या यंत्रणांप्रमाणे सहकार्य करू, असे खडसेंनी सांगितले.
दरम्यान एकनाथ खडसे ईडीच्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना पुढे म्हणाले कि , ईडीची नोटीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून मला फोन येत आहेत. त्यातून लोकांकडून सहानुभूती व्यक्त केली जात आहे. लोकांना असे वाटते की, हा एक प्रकारचा माझ्यावर अन्याय आहे. माझ्या वारंवार होत असलेल्या चौकशा लोकांना आवडलेल्या दिसत नाहीत. पण काही निर्णय असतात, त्या आधीन राहून काम करायचे असते, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. आधी ईडीचे होऊन जाऊ द्या मग सीडी विषयी बोलू असे एका प्रश्नाच्या उत्तरात खडसे म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांचा खडे यांना सीडीवरून टोला
दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांना EDच्या नोटीस आल्या. त्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. म्हणूनच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करताना EDचा उल्लेख केला होता. यामुद्द्यावर चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. खडसेंना EDची नोटीस आल्यास मी CDलावेन असं ते म्हणाले होते त्यावर आपलं मत काय? असा सवाल त्यांना करण्यात आला होता. याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “ED ही एक स्वतंत्र संस्था आहे. त्यात कोणाचाही हस्तक्षेप नसतो. भाजपा ED मागे लावते असं त्यांना वाटतंय का? EDची एक स्वतंत्र यंत्रणा आहे. आणि राहिला प्रश्न CD लावण्याचा… तुम्ही खुशाल CD लावा. तुम्हाला कोणी रोखले आहे?”, असं उत्तर त्यांनी दिलं.