EmploymentNewsUpdate : भारतीय स्टेट बँकेची मेगा भरती , बेरोजगार तरुणांना मोठी संधी

भारतीय स्टेट बँकेने वेगवेगळ्या पदांवरच्या ४५२ रिक्त जागांवर भरती करण्याची ऑनलाइन अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार sbi.co.in या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर ११ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. दरम्यान काही पदांसाठीची भरती उमेदवारांनी अर्ज सादर केल्यानंतर त्यातून निवडलेल्या उमेदवारांच्या थेट मुलाखतीद्वारे होणार आहे तर अन्य पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन चाचणी होणार असून, ती फेब्रुवारी २०२१ मध्ये होण्याची शक्यता आहे.
एकूण रिक्त जागांपैकी १६ जागा स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (इंजिनीअर – फायर) (SCO) या पदासाठी आहेत. डेप्युटी मॅनेजर (इंटर्नल ऑडिट) या पदासाठी २८, स्पेशालिस्ट ऑफिसर (नेटवर्क स्पेशालिस्ट) या पदासाठी ३२, स्पेशालिस्ट केडर ऑफिसर (सिक्युरिटी अॅनालिस्ट) या पदासाठी १००, स्पेशालिस्ट केडर ऑफिसर या पदासाठी २३६, स्पेशालिस्ट केडर ऑफिसर (मॅनेजर – क्रेडिट प्रोसीजर्स) या पदासाठी २, तर स्पेशालिस्ट क्रेडिट ऑफिसर (मार्केटिंग) या पदासाठी ३८ जागा बँकेला भरायच्या आहेत. स्क्रोलमध्ये याबाबत वृत्त देण्यात आलं आहे.
दरम्यान या सर्व पदासाठी पात्र उमेदवारांनी योग्य त्या पद्धतीने आपली संबंधित सर्व कागदपत्रे अर्ज करताना अपलोड करावी लागणार आहेत. तसे न केल्यास त्यांचा अर्ज ग्राह्य न धरता बाद केला जाईल, असं टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीत नमुद करण्यात आलं आहे. ११ जानेवारी २०२१पर्यंत अर्जासोबत शुल्कही ऑनलाइन पद्धतीने जमा केल्यावरच नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांना sbi.co.in या वेबसाइटच्या होमपेजवरच्या ‘करिअर्स’ या टॅबवर जावं लागणार आहे. त्या पेजवर ‘लेटेस्ट अनाउन्समेंट’ या विभागात रिक्त पदांच्या भरतीची माहिती देण्यात आली असून, तेथे ‘अप्लाय ऑनलाइन’ यावर क्लिक करायचं आहे. अर्ज केलेले उमेदवार पात्रतेच्या निकषात बसत असतील तरच आणि त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच भरती अंतिम समजण्यात येईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.