MaharashtraNewsUpdate : दिलासादायक : शासकीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी शासनाचा मोठा निर्णय

राज्य सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना खासगी रुग्णालयात केलेल्या कोरोनावरील उपचारांच्या खर्चाची परतफेड करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. २ सप्टेंबर २०२० पासून हा आदेश लागू होईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. टोपे यांनी ट्विटरवरुन सांगितलं की, “शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी आकस्मित तसेच गंभीर आजारावर खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यांच्यावर होणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती देण्यात येते. हा वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोविड-१९ या आजाराचा अंतर्भाव करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.”
शासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांनी आकस्मित तसेच गंभीर आजारावर खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यांच्यावर होणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती देण्यात येते.सदर वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोविड-19 या आजाराचा अंतर्भाव करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 17, 2020
शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आकस्मिक तसेच गंभीर आजारावर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यावर होणाऱ्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती दिली जाते. राज्य शासनाने मार्च २००५ मध्ये जाहीर केलेल्या शासन निर्णयात २७ आकस्मिक आणि ५ गंभीर आजार निश्चित केले आहेत. त्यात हृदय आणि फुफ्फुसाशी निगडित आजारांचा समावेश असला तरी करोनाबाबतच्या उपचाराचा वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीत स्पष्टता आणण्यासाठी या आजाराचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान कोरोना कालावधीत दि. २ सप्टेंबरपासून शासकीय कार्यालयातील उपस्थिती देखील वाढविण्यात आली होती. आज जाहीर झालेला हा निर्णय २ सप्टेंबर २०२० पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. त्यामुळे करोनाच्या विळख्यात सापडलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.