Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : भारतीय रेल्वेमधील प्रलंबित असलेल्या तब्बल एक लाख चाळीस हजार पदांसाठी होतेय मेगा भरती

Spread the love

भारतीय रेल्वेमधील प्रलंबित असलेल्या तब्बल एक लाख चाळीस हजार विविध पदांसाठीच्या मेगा भरतीकरता  उद्या  १५ डिसेंबरपासून ऑनलाइन परीक्षा सुरू होत आहेत.  रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डतर्फे या परीक्षा तीन टप्प्यात घेण्यात येणार असून, याचं वेळापत्रक नुकतंच जाहीर करण्यात आलं आहे. देशभरातील तब्बल 2.5 कोटी उमेदवार  या परीक्षा देणार असल्याचे आज तक  च्या वृत्तात म्हटले आहे.

या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी रेल्वेतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेक तारखांना आणि शिफ्टसमध्ये या परीक्षा होतील. पहिल्या टप्प्यातील परीक्षा १५ ते १८ डिसेंबर दरम्यान, तर दुसऱ्या टप्प्यातील एनटीपीसी विभागातील परीक्षा २८ डिसेंबरपासून सुरू होतील, त्या मार्चपर्यंत चालतील. तर तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा एप्रिल पासून सुरू होऊन जूनअखेरपर्यंत चालतील, असं रेल्वेनं कळवलं आहे.

विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था

दरम्यान प्रत्येक राज्यातील उमेदवारांना त्यांच्या शहरातच किंवा जवळच्या केंद्रावर परीक्षा देता यावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या परीक्षा सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डला (RRB) राज्यातील स्थानिक प्रशासनानं सहकार्य करण्याबाबत राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना सांगण्यात आलं आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना आपल्या परीक्षा केंद्रावर पोहोचता यावं यासाठी रेल्वेनं विशेष रेल्वेगाड्यांची सोय केली आहे. प्रत्येक उमेदवाराला ई-मेल आणि एसएमएसद्वारे त्यांचे परीक्षा केंद्र आणि वेळ कळवली जाईल. त्यासाठी एक लिंक देण्यात येणार असून त्यावरून परीक्षा केंद्रावरील प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल.

कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक

बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर विशेष खबरदारी घेण्यात येणार असून, सुरक्षिततेच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. एका परीक्षा केंद्रावर एका दिवसात दोन शिफ्टमध्ये परीक्षा होईल. प्रत्येक शिफ्टनंतर परीक्षा केंद्र सॅनिटाइझ करण्यात येणार आहे. प्रत्येक उमेदवारानं मास्क घालणं बंधनकारक असून, सॅनिटायझरचा वापर करणं, सुरक्षित अंतर राखणे अनिवार्य आहे. उमेदवाराचे तापमान चेक करूनच त्याला परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार असून, निश्चित केलेल्या पातळीपेक्षा अधिक तापमान असल्याचं आढळल्यास त्या उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही. त्यांची परीक्षा नंतर घेतली जाईल, त्याची तारीख त्यांना कळवली जाईल. तसंच प्रत्येक उमेदवाराला ‘कोविड 19’ बाबतचे (Covid 19) सेल्फ डिक्लेरेशन देणंही अत्यावश्यक आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!