AurangabadNewsUpdate : धारदार शस्त्राने वार करून घेतला पाळीव श्वान मादीचा जीव , मद्यपीविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल

औरंंंगाबाद : दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या मद्यपीने धारदार चाकूने वार करून पाळीव श्वान मादीचा जीव घेतल्याची घटना पानचक्की परिसरातील प्रबुध्दनगर येथे ९ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. यश सिध्दार्थ बचके (रा.प्रबुध्दनगर, पानचक्की परिसर) असे मद्यपीचे नाव आहे.
पानचक्की परिसरातील प्रबुध्दनगरात राहणा-या जितेंद्र पुंडलिक आदमाने (वय ५०) यांनी एक वर्ष वयाची पांढ-या रंगाची श्वान मादी पाळली होती. बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जितेंद्र आदमाने हे परिसरातील सत्तार भाई यांच्या किराणा दुकानात सामान घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची पाळीव श्वान आदमाने यांच्या पाठीमागे आली होती. त्यावेळी दारूच्या नशेत तर्रर्र उभ्या असलेल्या यश बचके याने आपल्या जवळील धारदार चाकूने आदमाने यांच्या श्वानाच्या पोटात भोसकले. चाकूचा वार वर्मी लागल्याने आदमाने यांची पाळीव श्वान जागेवरच गतप्राण झाली.
याप्रकरणी जितेंद्र आदमाने यांनी दिलेल्या तक्रारीवरून यश बचके याच्याविरूध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बावस्कर करीत आहेत.