IndiaNewsUpdate : ट्रम्प यांच्या मावळत्या वर्षात भारताने किती अब्ज रुपयांची शस्त्रखरेदी केली ? तुम्हीच पहा ….

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोस्ती जगजाहीर आहे . दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या मावळत्या कार्यकाळात भारताने मोठ्या प्रमाणावर शस्त्रखरेदी केली असल्याचे वृत्त आहे. त्यातही अखेरच्या वर्षात सर्वाधिक शस्त्रखरेदी झाली आहे. अमेरिकेकडून करण्यात आलेल्या एकट्या भारताचा शस्त्रखरेदीचा आकडा हा ६२ कोटी अमेरिकेन डॉलरहून २०२० मध्ये ३.४ अब्ज डॉलर इतका झाला. अमेरिकेच्या डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजेन्सीने (डीएससीए) दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेकडून इतर देशांना होणाऱ्या शस्त्र विक्रीत घट झाल्यानंतर भारतासोबत शस्त्र विक्रीत वाढ झाली आहे. अमेरिकेने इतर देशांना २०२० मध्ये ५०.८ अब्ज डॉलरचे शस्त्र विक्री केली होती. तर, २०१९ मध्ये अमेरिकेने इतर देशांना एकूण ५५.७ अब्ज डॉलर किंमतीची शस्त्र विक्री केली होती. २०१७ मध्ये हा आकडा ४१.९ अब्ज डॉलर इतका होता.
याबाबत मटामध्ये प्रसिद्ध झालेल्या आकड्यांनुसार, वर्ष २०२० मध्ये अमेरिकेच्या शस्त्र खरेदीचा प्रमुख खरेदीदार भारत आहे. अमेरिकेने भारताला ६२ कोटी डॉलरची शस्त्रे विक्री केली होती. भारताच्या शस्त्र खरेदीचा आकडा २०२० मध्ये ३.४ अब्ज डॉलर इतका झाला. तर, मोरक्कोला ४.५ अब्ज डॉलर (२०१९ मध्ये १.२४ कोटी), पोलंडला ६.७ अब्ज डॉलर (२०१९ मध्ये ६७.३ कोटी डॉलर), सिंगापूरला १.३ अब्ज डॉलर (२०१९ मध्ये १३.७ कोटी डॉलर) तैवानला ३.६ अब्ज डॉलर (२०१९ मध्ये १.१ अब्ज डॉलर) किंमतीची शस्त्र विक्री करण्यात आली. याच दरम्यान, काही देशांनी अमेरिकेकडून शस्त्र खरेदी कमी केली. यामध्ये सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, बेल्जियम, इराक आणि दक्षिण कोरिया या देशांचा समावेश आहे. अमेरिकेच्या ‘हिस्टोरिकल सेल्स बुक’च्या २०२० मधील आवृत्तीनुसार, भारताने २०१७ मध्ये ७५.४४ कोटी डॉलर आणि २०१८ मध्ये २८.२ कोटी डॉलर किंमतीची शस्त्र खरेदी केली होती.
दरम्यान उघडकीस आलेल्या आकडेवारीनुसार, वर्ष १९५० ते २०२० दरम्यान, अमेरिकेने फॉरेन मिलिट्री सेल्स (एफएमएस) अंतर्गत भारताला १२.८ अब्ज अमेरिकन डॉलर किंमतीची शस्त्र विक्री केली. तर, ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला कोणत्याही प्रकारची सैन्य आणि संरक्षण मदत करण्यास मनाई केली होती. तरीदेखील अमेरिकेने एफएमएसच्या अंतर्गत पाकिस्तानला शस्त्र विक्री करण्यात आली. पाकिस्ताने अमेरिकेकडून २०२० मध्ये १४.६ कोटी डॉलरचे शस्त्र खरेदी केली होती.