Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी

Spread the love

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद, नागपूर, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून आणि पुणे, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निर्वाचित झालेल्या ५ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी विधानभवनात झाला. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या पाच नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले सतीश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस), नागपूर  विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले अभिजित वंजारी  (काँग्रेस), पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले अरुण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस), पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले जयंत आसगांवकर (काँग्रेस) आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले किरण सरनाईक (अपक्ष) यांनी आज आपल्या पदाची शपथ घेतली.

विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित या शपथविधी कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रीमंडळातील विविध विभागांचे मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित होते.

सतीश  चव्हाण यांचा विक्रम

महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत असलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाली. धुळे-नंदुरबारची एकमेव जागा वगळता इतर ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. मराठवाडा पदवीधर मतदारंसघ राष्ट्रवादी काँग्रेसने तिसऱ्यांदा राखला. सतीश चव्हाण यांनी विक्रमी ५८ हजारांचे मताधिक्य घेत या मतदारसंघातून भाजपचे शिरीष बोराळकर यांचा दुसऱ्यांदा पराभव केला. शिवसेना- काँग्रेस या दोन आघाडीतील पक्षाची ताकद चव्हाण यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिल्यामुळे चव्हाण यांचा मोठा विजय झाला.

मतदार नोंदणीसाठी घेतलेली मेहनत, नियोजनबद्ध पद्धतीने केलेला प्रचार आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणून मतदान करवून घेण्यात आलेले यश याचा परिणाम सतीश चव्हाण यांच्या विजयाच्या रुपाने दिसून आला होता. सतीश चव्हाण यांनी या निवडणुकीसाठी राबवलेल्या रणनितीचे कौतुक खुद्द शरद पवारांनी देखील केले. विक्रमी मतांनी विजय झाल्यामुळे जबाबदारी वाढली असून आता पदवीधर आणि सर्वसामान्याची कामे करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा, असा सल्ला देखील पवारांनी चव्हाण यांना विजयानंतरच्या भेटीत दिला होता. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी चव्हाण यांना शपथ दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,अजित पवार, उपसभापती .नीलम गोऱ्हे आदींनी सतीश चव्हाण यांचे अभिनंदन केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!