Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी ८ डिसेंबरला भारत बंद , काँग्रेससह ११ पक्षांचा सहभाग

Spread the love

असे असेल आंदोलनाचे स्वरूप

शेतकरी नेत्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात ८ डिसेंबरला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत भारत बंद पुकारण्यात आला आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत चक्का जाम असेल. रुग्णवाहिका आणि लग्न समारंभासाठी रस्ते खुले असतील. सर्वच ठिकाणी शांततेत निदर्शनं करण्यात येतील. चंदिगडमध्ये सेक्टर १७ च्या मैदानावर शेतकरी ७ तारखेला मोठं आंदोलन करणार आहेत, अशी माहिती शेतकरी नेते बलदेवसिंग निहालगड यांनी दिली.

मोदी सरकारने केलेल्या नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच असून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी  मंगळवारी  दि . ८ डिसेंबर रोजी  शेतकरी संघटनांनी या कायद्यांचा निषेध करण्यासाठी भारत बंदची हाक दिली आहे . या भारत बंदला देशभरातील विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. यामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना , समाजवादी पार्टी, आम आदमी पक्षासह देशातील सर्व विरोधी पक्षांचा समावेश आहे.

याबाबत शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ ११ विरोधी पक्षांनी एक निवेदन जारी केलं आहे. कॉंग्रेस, समाजवादी पार्टी, पीएजीडी, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, सीपीआय (एमएल), आरएसपी, आरजेडी, द्रमुक आणि एआयएफबी यांनी शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि कृषी कायदा २०२० मध्ये दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत. शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला आणि त्यांनी पुकारलेल्या भारत बंदला आमचा पाठिंबा आहे, असं विरोधी पक्षांनी या निवेदनात म्हटलं आहे.

अखिलेश यादव यांची उद्यापासून किसान यात्रा

नवीन कृषी कायदे हे संसदेत लोकशाहीची पायमल्ली करून बनवण्यात आले आहे. या कायद्यांवेळी मतदान आणि चर्चाही झाली नाही. हे कायदे देशाच्या अन्नसुरक्षेसाठी धोकादायक आहेत. यामुळे आपला शेतकरी आणि कृषी व्यवस्था नष्ट होईल. यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ९ डिसेंबरला रात्री ९ वाजता राष्ट्रपतींना भेटण्यासाठी वेळही मागितला आहे, असं निवेदनात म्हटलं आहे. दरम्यान शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे उद्यापासून किसान यात्रा काढण्याच्या तयारीत आहे. उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात सपा किसान यात्रा काढली जाईल अशी घोषणा समाजवादी पक्षाने केली आहे.

अरविंद केजरीवाल यांचे आवाहन

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दिल्लीतील जनतेने शेतकऱ्यांचं आंदोलन यशस्वी करावं, असं आवाहन केजरीवाल यांनी केलं आहे. शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला पुकारलेल्या भारत बंदला आम आदमी पार्टीचा पूर्ण पाठिंबा आहे. देशभरातील आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते शांततेत बंदला पाठिंबा देतील. सर्व देशवासियांना शेतकर्‍यांना साथ द्यावी आणि त्यात सहभागी व्हावं, असं आवाहन केजरीवाल यांनी केलं आहे. त्याचबरोबर दि . ८ डिसेंबरच्या भारत बंदला कॉंग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे. याआधीही कॉंग्रेस पक्षाने संसदेपासून ते रस्त्यापर्यंत शेतकरीविरोधी तिन्ही काळ्या कायद्यांविरोधात जोरदार लढा दिला आहे, असं कॉंग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल म्हणाले.

तेलंगणातही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ निदर्शनं करण्याची तयारी सुरू आहे. आम्ही संसदेत कृषी विधेयकालाही विरोध केला होता आणि आम्ही आपला विरोध सुरूच ठेवू. कोणत्याही कायद्यात किमान आधारभूत किंमतीच्या तरतूद केल्याचा उल्लेख नाही आणि त्याच वेळी, जर देशात बाजार समिती यंत्रणा संपली तर शेतकर्‍यांना पर्याय राहणार नाही. यामुळे आमचा शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा आहे, असं टीआरएस नेत्या कविता म्हणाल्या.

समाजवादी जन परिषदेचाही पाठिंबा

शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे रद्द करा, शेतीमालास हमी भाव देणारा कायदा निर्माण करा या मागण्यांसाठी देशात निर्माण झालेले पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश मध्यप्रदेश महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आंदोलनाला समाजवादी जन परिषदेचे अध्यक्ष अॅड. विष्णू ढोबळे यांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे.

या निमित्ताने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की , शेतकरी वर्गाचे हक्क राखण्यासाठी भारत बंद शांततेत यशस्वी करावा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समाजवादी जनपरिषदेने नुकताच राष्ट्रीय अन्नत्याग सत्याग्रह केला. केंद्र सरकारने २०२० मध्ये संमत केलेले तिन्ही कायदे शेतकरी शेती आणि समाज विरोधी आहेत.  शेती , शेतकरी आणि समाजविरोधी आहेत . देशातील ८५ टक्के शेतकरी अल्पभूधारक असून शेतीचे कंपनीकरण आणि कंत्राटीकरण या शेतकरीवर्गात उद्ध्वस्त करणारे आहे.  दरम्यान  महाराष्ट्रासह अन्य राज्यात शेतकरी आत्महत्या होत असून केंद्र सरकारची शेती आणि आर्थिक नीती जबाबदार असल्याचा आरोपही अॅड. ढोबळे यांनी केला आहे. दरम्यान हा भारत बंद यशस्वी करण्याचे आवाहन अॅड.  निशा शिवरकर , आप्पा मोरताटे,  शिवाजी गायकवाड, अॅड. सुरेश शिंदे , अॅड. मिलिंद डोंगरे, डॉ.  लक्ष्मणराव शिंदे,  प्रमोद पाटील , राजेंद्र डबीर आदींनी केले आहे.

लंडनमधील भारतीय दूतावासासमोर निदर्शने

आपलं सरकार

Click to listen highlighted text!