AurangabadCrimeUpdate : अखेर खुनाला वाचा फुटली , सहायक फौजदाराच्या सूनेची हत्याच , चौघांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल

औरंगाबाद : बीडबायपास, अबरार कॉलनीतील सहायक फौजदाराच्या सूनेचा तीन महिन्यांपुर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यावेळी तिने गळफास घेतल्याची ओरड सासरच्या मंडळींनी केली होती. त्यावरुन सुरूवातीला माहेरच्या मंडळींनी दिलेल्या तक्रारीवरुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तिच्या शवविच्छेदनाचा अहवाल ४ डिसेंबर रोजी गुन्हे शाखा पोलिसांना प्राप्त झाला असून, त्यात तिचा गळा आवळून खून केल्याचे म्हटले आहे. त्यावरुन सासरा सहायक फौजदार समिऊद्दीन चिरागोद्दिन सिद्दीकी, पती अनिसोद्दीन सिद्दीकी, सासू आशा सिद्दीकी, दिर दानिश सिद्दीकी (सर्व रा. अबरार कॉलनी, सातारा परिसर) यांच्या विरूध्द खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बीबी कुलसूम अनीसोद्दीन सिद्दीक्की (२७, रा. अबरार कॉलनी, सातारा परिसर) या विवाहितेचा ५ आॅक्टोबर रोजी सकाळी आठच्या सुमारास घरात मृतदेह आढळून आला होता़ त्यावेळी ती सहा महिन्यांची गर्भवती होती़ तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी मृतदेह पाहिल्यावर अंगावर मारहाणीचे व्रण होते़ त्यामुळे माहेरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींविरुध्द गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही. अशी भूमिका घेतली होती. तसेच तिचा सासरा पोलिस दलात सहायक फौजदार असल्याने पोलिस तक्रार घेत नसल्याचा आरोप देखील केला होता. त्यावेळी पोलिसांनी समजूत काढून मृतदेह सुपूर्द केला होता़ त्यानंतर ८ आॅक्टोबर रोजी याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला होता़
मारहाणीनंतर गळा आवळला…….
घाटी रुग्णालयातील सहा डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन अहवाल तयार केला. त्यात त्यांनी बीबी कुलसूम हिच्या गळ्यावर टणक वस्तूचा दाब दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर सातारा पोलिसांनी या प्रकरणात खूनाची कलम वाढविली आहे़ या गुन्ह्यात मृत विवाहितेचा पती अनिसोद्दीन सिद्दीकी हा अटकेत असून, सासरा समिऊद्दीन सिद्दीकी, सासू आशा सिद्दीकी, दिर दानिश सिद्दीकी हे अद्यापही पसार आहेत.