MaharashtraNewsUpdate : शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा , अकाली दल नेत्यांच्या भेटीप्रसंगी उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

देशात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिरोमणी अकाली दलाच्या शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा असेल असे आश्वासन दिल्याची माहिती अकाली दलाच्या नेत्यांनी दिली. भेटीनंतर अकाली दलाच्या नेत्यांनी सांगितले, “शेतकरी आंदोलनादरम्यानच्या सर्व कार्यक्रमांना आपला पाठिंबा असेल. दिल्लीत दोन आठवड्यांनंतर होणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीलाही ते हजेरी लावणार आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले”
Mumbai: A Shiromani Akali Dal delegation met Maharashtra CM Uddhav Thackeray today.
"He said that he'll support all programs of farmers during agitation. He'll also come to the meeting in Delhi two weeks later. He said that he'll support farmers' agitation," says the delegation. pic.twitter.com/xbPxGgfnB8
— ANI (@ANI) December 6, 2020
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष आणि खासदार प्रेमसिंग चंदू माजरा यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चाही झाली. या भेटीनंतर शिवसेनेनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या सर्व आंदोलनांना शिवसेनेनं पाठिंबा दिला असून दिल्लीच्या समन्वय बैठकीमध्येही शिवसेना सहभागी होणार आहे, अशी माहिती अकाली दलाचे खासदार चंदू माजरा यांनी दिली आहे. शिवाय, शरद पवार यांचीही आम्ही भेट घेणार असून ती आज झाली नाही तर दिल्लीत सर्व स्थानिक राजकीय पक्षांच्या बैठकीचे आयोजन करणार असून अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंह बादल या बैठकीचे नेतृत्व करतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या उग्र आंदोलनात अकाली दलाचा सहभाग असून या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळवण्याचा आणि हे कायदे रद्द करण्यास भाग पाडण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा अकाली दलाचा प्रयत्न आहे. याच उद्देशाने अकाली दलाच्या शिष्टमंडळाने मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती केली.
शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल हे दोन्ही पक्ष याआधी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सदस्य होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध आहेत. शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचे निश्चित केले आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, त्यानंतर शिवसेना वर्षभरापूर्वी एनडीएतून बाहेर पडली. तसेच मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना कडाडून विरोध करताना शिरोमणी अकाली दलाने काही महिन्यांपूर्वी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.