MumbaiNewsUpdate : खा . संजय राऊत यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया , प्रकृती स्थिर

दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक खा . संजय राऊत यांच्यावर यशस्वी अँजिओप्लास्टी सर्जरी करण्यात आली. तब्बल सव्वा तास ही सर्जरी चालली. संजय राऊत यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांच पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. छातीत पुन्हा त्रास सुरू झाल्यानंतर गुरूवारी दुपारी त्यांना मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हृदयरोग तज्ज्ञ डॉ.मॅथ्यू आणि डॉ.अजित मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
दरम्यान, संजय राऊत यांच्यावर हृदयात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दोन स्टेन घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आणखी स्टेन टाकावे लागतील असंही डॉक्टरांनी सांगितलं होतं. एप्रिल महिन्यात डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी वेळ दिली होती. पण, मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे संजय राऊत यांच्यावर होणारी सर्जरी पुढे ढकलण्यात आली होती. संजय राऊत यांनी गेल्या आठवड्यात शनिवारी लीलावती हॉस्पिटलमध्ये रुटीन चेकअपसाठी गेले होते. तेव्हा त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र, घरी आल्यानंतर त्यांना थकवा जाणवत होता. त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.