MaharashtraNewsUpdate : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : ७ पैकी ३ आरोपी हजर , सर्व आरोपींना हजर राहण्याचे कोर्टाचे आदेश

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील खटल्याची नियमित सुनावणी गुरूवार ३ डिसेंबरपासून सुरु झाली असली तरी पहिल्या दिवशी सातपैकी केवळ तीन आरोपी न्यायालयासमोर हजर झाल्यामुळे न्यायालयाची कारवाई होऊ शकली नाही. त्यावर न्यायालयाने आता येत्या १९ डिसेंबरला सातही आरोपींना कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात पार पडलेल्या गुरूवारच्या सुनावणीत लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरेहीत, अजय राहिरकर आणि समीर कुलकर्णी हे तीन आरोपी कोर्टापुढे हजर झाले होते. या खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या तातडीनं कोर्टापुढे हजर होऊ शकणार नाहीत असे न्यायालयाला कळवण्यात आल्याने हि कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे.
दरम्यान एनआयएकडून डिसेंबर 2020 पर्यंत हा खटला निकाली काढला जाईल असे मुंबई उच्च न्यायालयात सांगितले होते मात्र लॉकडाऊनपूर्वीच्या सहा महिन्यांत या खटल्यातील केवळ १४जणांचीच साक्ष नोंदवण्यात आली आहे. या खटल्यात एकूण ४७५ साक्षीदार आहेत ज्यातील ३०० हून अधिक साक्षीदारांची साक्ष अद्याप बाकी आहे. मार्चपासून कोरानाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या लॉकडाऊनमुळे यात काहीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे महिन्याभरात ही सुनावणी कशी पूर्ण होणार हा सवालच आहे.
गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या खटल्याची सुनावणी जलदगतीनं घेण्याचे निर्देश हायकोर्टानं याआधीच एनआयए कोर्टाला दिलेले आहेत. मात्र अनेकदा या खटल्याच्या सुनावणीला कधी वकील हजर राहत नाहीत , कधी आरोपी तर कधी साक्षीदार त्यामुळे या खटल्याला जाणून बुजून विलंब केला जात असल्याचा आरोप आरोप या बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी समीर कुलकर्णी यांच्यावतीनं वारंवार करण्यात आला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटला एनआयए कोर्टाने लवकरात लवकर निकाली काढावा अशी मागणी करत सध्या जामीनावर असलेले आरोपी समीर कुलकर्णी यांनी हायकोर्टात केला होती.
मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८रोजी एका मशिदीत बॉम्बस्फोट झाले होते. यात ७ जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर आणि संदिप डांगे यांना अटक करून त्यांच्यावर एनआयए विशेष न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यातील काही संशयित आरोप अद्याप फरार असून वरील सर्व आरोपी जामीनवर आहेत.